ऑनलाईन पेमेंट केल्याचे स्क्रिनशॉट दाखवून आर्थिक फसवणुक
सव्वानऊ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – सांताक्रुज येथील हयात हॉटेलमध्ये असलेल्या टॉय रुम क्लबमध्ये आलेल्या ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केल्याचे स्क्रिनशॉट दाखवून सुमारे सव्वानऊ लाखांची आर्थिक फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी क्लबचे उपाध्यक्ष राहुल दिपक प्रभू यांच्या तक्रार अर्जावरुन वाकोला पोलिसांनी पुण्यातील रहिवाशी असलेल्या चौघांविरुद्ध कट रचून बोगस दस्तावेजाच्या मदतीने पैशांचा अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. ओमकार संजय दरेकर, आर्या अण्णासाहेब पाटील, अमन अमोल ताम्हणे आणि आदित्य गिरीश यादव अशी या चौघांची नावे असून त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. या चौघांच्या अटकेसाठी वाकोला पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच पुण्यात जाणार आहेत. व्हॅलेनटाईनच्या दिवशी फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
राहुल दिपक प्रभू हे व्यावसायिक असून ते वरळी परिसरात राहतात. सांताक्रुज येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये टॉय रुम क्लब असून या डान्स क्लबमध्ये ते उपाध्याक्ष म्हणून काम पाहतात. आठवड्याला शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस प्रसंगी अन्य दिवशी हा क्लब सुरु असतो. त्यासाठी ग्राहकांकडून आगाऊ बुकींग करुन ग्राहकांना विविध सुविधा पुरविले जाते. त्यांनी दिल्लीतील कॅम्बेल कंपनीला हा क्लब चालविण्यासाठी दिला आहे. अनेक ग्राहक ऑनलाईन पेमेंट करुन पेमेंट केल्याचे स्क्रिनशॉट क्लबच्या शुमायला खान आणि साक्षी संपत यांच्या मोबाईलवर पाठवतात. त्यानंतर अशा ग्राहकांना क्लबमध्ये प्रवेश दिला जातो. नोव्हेबर २०२३ पासून त्यांच्या डान्स क्लबच्या बिलांची पाहणी केल्यानंतर त्यात त्यांना काही रक्कमेत तफावत असल्याचे दिसून आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तीन महिन्यांच्या आर्थिक व्यवहार तपासण्यात आला होता. त्यात चार मोबाईल क्रमांकावरुन पेमेंट केल्याचे फोन पेचे बोगस स्क्रिनशॉट पाठविल्याचे दिसून आले. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली नव्हती. १४ फेब्रुवारीला त्यांच्या डान्स क्लबमधये १९ पुरुष आणि १३ महिला आले होते. त्यांचे बिल सुमारे सव्वानऊ लाख रुपये झाले होते. ते पेमेंट त्यांनी ऑनलाईन केल्याचे फोन पेचे स्क्रिनशॉट दाखविले होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम बँक खात्यात जमा न झाल्याने कंपनीच्या वतीने राहुल प्रभू यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या तक्रारीत ओमकार दरेकर, आर्या पाटील, अमन ताम्हणे आणि आदित्य यादव यांनी पेमेंट केल्याचे बोगस फोन पेचे स्क्रिनशॉट पाठविल्याचे नमूद करण्यात आले होते. चारही आरोपी मूळचे पुण्याचे रहिवाशी आहे. अशा प्रकारे या चौघांनी बोगस पेमेंट केल्याचे स्क्रिनशॉट पाठवून क्लबची आर्थिक फसवणुक केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध कट रचून बोगस पेमेंट केल्याचे स्क्रिनशॉट पाठवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून मोबाईल क्रमांकावरुन चारही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.