शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने ऑनलाईन फसवणुक

तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने एका ३६ वर्षांच्या व्यक्तीची सुमारे आठ लाखांची ऑनलाईन केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या पंकज वंशी तिवारी या आरोपीस तीन महिन्यांनी गोरेगाव पोलिसांनी अटक केली. फसवणुकीसाठी त्याने बँकेत खाते उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

नागेंद्रकुमार रामसामुज चौहाण हे गोरेगाव येथील प्रेमनगर, आदर्श सेवा समिती परिसरात राहतात. त्यांचा फार्मास्टिटचा व्यवसाय असून त्यातून मिळणार्‍या उत्पनातून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. ४ नोव्हेंबरला ते त्यांच्या घरी असताना त्यांना एक मॅसेज आला होता. या मॅसेजमध्ये त्यांना ट्रेडिंगविषयी माहिती देण्यात आली होती. काही वेळानंतर याच मोबाईलवरुन एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन ट्रेडिंगबाबत माहिती सांगून गुंतवणुक करण्यास आपण इच्छुक आहात का अशी विचारणा केली होती. त्यांच्याकडून होकार आल्यानंतर त्यांना संबंधित व्यक्तीने दररोज ऑनलाईन सिकोया बिझनेस कॅपिटल स्कूल या नावाने सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंंत क्लास होईल, त्यात त्यांना ट्रेडिंगबाबत माहिती दिली जाईल असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करुन घेतले होते. या व्हॉटअप ग्रुपमध्ये त्यांना रोज ट्रेडिंगबाबतची एक लिंक येत होती. त्यांच्या क्लासेसमध्ये त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत सल्ला देताना त्यांना चांगला परवाता मिळेल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

या व्यक्तीच्या सांगण्यावरुन त्यांनी शेअर मार्केटमध्ये सुमारे आठ लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र गुंतवणुकीनंतर त्यांना ठराविक दिवसानंतर परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला संपर्क साधून विचारणा केली. मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. नंतर त्याने त्यांना ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पंकज तिवारी या संशयिताला तीन महिन्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. फसवणुकीसाठी त्याने ओपन केलेल्या एका बँक खात्याचा वापर झाला होता. त्यात ही रक्कम जमा झाली होती. या संपूर्ण कटाची पंकज तिवारीला माहिती होती. त्यामुळे तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघड झाला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page