मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2025
मुंबई, – बँक खात्याची कुठलीही माहितीसह ओटीपी शेअर केले नसताना एका निवृत्त डॉक्टरच्या एनआयई खात्यातून अज्ञात सायबर ठगांनी सुमारे पावणेदहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारीही संमातर तपास करत आहेत.
अली खालिद हुसैन हे 65 वर्षांचे वयोवृद्ध व्यवसायाने डॉक्टर असून ते सध्या निवृत्त झाले आहेत. अली हुसैन हे त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, सिटीझन अपार्टमेंटमध्ये राहतात. गेल्या काही वर्षांपासून ते अमेरिकेत नोकरीस होते, निवृत्तीनंतर ते सहा वर्षांपासून भारतात वास्तव्यास असून त्यांचे अंधेरीतील एका खाजगी बँकेत एनआयई खाते आहे. 18 जानेवारीला ते अमेरिकेतील त्यांच्या घरी होते. यावेळी सायंकाळी पावणेपाच वाजता त्यांच्या मोबाईलवर काही मॅसेज आले होते. त्यात वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याबाबत नमूद करण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यात 5 लाख 36 हजार 364 रुपये ट्रान्स्फर झाले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बँक अधिकार्यांना संपर्क साधला होता. यावेळी बॅक अधिकार्यांनी त्यांच्या ऑनलाईन व्यवहाराची सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून अशाच प्रकारे 47 हजार 027, 46 हजार 480 आणि 2 लाख 62 हजार 755 रुपयांचे इतर तीन ऑनलाईन व्यवहार झाले होते. या सर्व व्यवहारातून त्यांच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर ठगाने 9 लाख 77 हजार 626 रुपयांचे डेबीट झाले होते. दोन दिवसांनी मुंबईत आल्यानंतर त्यांनी बीकेसी येथील सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. यावेळी सायबर पोलिसांनी त्यांना ओशिवरा पोलिसांतही तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा ओशिवरा पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.