केवायसी-पॅनकार्ड अपडेटच्या नावाने सव्वासात लाखांची फसवणुक
घाटकोपर-भांडुप पोलिसांत फसवणुकीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मे २०२४
मुंबई, – पॅनकार्डसह केवायसी अपडेटच्या नावाने दोन वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगांनी सुमारे सव्वासात लाखांचा अपहार करुन एका व्यावसायिकासह दोघांची फसवणुक केल्याची घटना घाटकोपर आणि भांडुप परिसरात घडली. याप्रकरणी दोघांकडून फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच घाटकोपर आणि भांडुप पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत दोन गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
४१ वर्षांचे तक्रारदार भांडुप येथे राहत असून ते एका नामांकित बिल्डरकडे सिनिअर फोरमन म्हणून कामाला आहे. २६ एप्रिलला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो त्यांच्या बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून त्यांच्या बँकेचे केवायसी अपडेट बाकी आहे. केवायसी अपडेट करा नाहीतर त्यांचे बँक खात्यातील व्यवहार बंद होईल असे सांगितले. त्यासाठी त्याने त्यांच्या मोबाईलवर बँकेचे बोगस ऍप पाठविले होते, या ऍपवर सर्व डिटेल्स माहिती दिल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. काही वेळानंतर त्यांना बँकेतून मॅसेज आले होते. ते मॅसेज पाहिल्यांनतर त्यांच्या बँक खात्यातून सव्वापाच लाख रुपये डेबीट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी भांडुप पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या घटनेत पॅनकार्ड अपडेटच्या नावाने एका ४५ वर्षांच्या व्यक्तीची अज्ञात सायबर ठगाने सुमारे दोन लाखांची फसवणुक केली. यातील तक्रारदारांचा इलेक्ट्रॉनिक तर त्यांच्या वडिलांचा हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. २१ एप्रिलला त्यांना एका मॅसेजद्वारे पॅनकार्ड अपडेटविषयी विचारणा करण्यात आली होती. या मॅसेजमध्ये एक लिंक होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर त्यांच्या खात्यातून अज्ञात सायबर ठगाने सुमारे दोन लाख रुपये ट्रान्स्फर करुन त्यांची फसवणुक केली होती. बँकेतून पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घाटकोपर पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर घाटकोपर आणि भांडुप पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.