आयआयटीच्या मटेरियल सायन्स इंजिनिअर विद्यार्थ्यांची आत्महत्या
पवईतील आयआयटी बॉम्बे कॅम्पसच्या वसतिगृहातील घटनेने शोककळा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२६
मुंबई, – आयआयटीच्या मटेरियल सायन इंजिनिअरचा विद्यार्थी असलेल्या सोहेल राजकुमार संघवान या वर्षांच्या तरुणाने मंगळवारी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पवईतील आयआयटी बॉम्बे कॅम्पस वसतिगृहात उघडकीस आली आहे. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. मात्र त्याने प्रेमसंबंधातून स्वतचे जीवन संपविल्याचे बोलले जाते. त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबियांसह त्याच्या मित्र-मैत्रिणीची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान सोहेलच्या आत्महत्येने वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.
सोहेल हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी असून गेल्या दोन वर्षांंपासून तो मुंबईत शिक्षण घेत आहेत. सध्या तो आयआयटीच्या दुसर्या वर्षांत होता. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने तो वसतिगृह क्रमांक चारच्या जी/४१४ रुममध्ये राहत होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेला. त्यानंतर त्याला कॅम्पस आणि वसतिगृहात अनेकांनी पाहिले होते. सायंकाळी त्याच्या पालकांनी त्याला कॉल केला, मात्र त्याने त्यांच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. वारंवार कॉल करुनही सोहेल त्यांचे कॉल घेत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याच्या पालकांनी ही माहिती संबंधित अधिकार्यांना सांगितली. तसेच त्याच्या रुममध्ये जाऊन पाहणी करण्याची विनंती केली होती.
या विनंतीनंतर वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाने त्याच्या रुममध्ये जाऊन पाहणी केली असता त्याला सोहेलने वसतिगृहाच्या त्याच्या रुममध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. सुरुवातीला त्याने दरवाजा ठोठावून प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती नंतर पवई पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी सोहेलला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सोसायट नोट सापडली नाही. त्यामुळे सोहेलने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही.
प्राथमिक तपासात सोहेलने सायंकाळी साडेपाच ते साडेदहाच्या दरम्यान आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. त्याचे कुटुंबिय दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तसेच सोहेलच्या इतर मित्र-मैत्रिणींचीही पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचा मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यातून त्याच्या आत्महत्येबाबत काही खुलासा होतो का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दुसर्या वर्गाचे शिक्षण सुरु झाल्यानंतर सोहेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याच्या पालकासह इतर विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
फेब्रुवारी २०२३ रोजी दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी परिषदेने विद्यार्थ्यांच्या कल्याण आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काही ठोस पावले उचलली होती. तरीही आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या काही वर्षांत देशभरात आयआयटीमध्ये शिक्षण घेणार्या ५५ ते ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते.