मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2025
मुंबई, – कुरार पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले सुभाष कांगणे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या आत्महत्येमागील अधिकृत कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र मानसिक नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविल्याचे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रावरुन उघडकीस आले आहे. याप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. सुभाष कांगणे यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईक आणि पोलीस दलातील सहकार्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
37 वर्षाचे सुभाष कांगणे हे मूळचे नाशिकचे रहिवाशी आहे. सध्या ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत गोरेगाव येथील नागरी निवारा परिसरात राहत होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांची मालवणी पोलीस ठाण्यातून कुरार पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यांची पत्नी आणि मुले त्यांच्या गावी गेले होते, त्यामुळे ते एकटेच घरी होते. सायंकाळही पाच वाजता त्यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचा नातेवाईक त्यांच्या घरी आला असता त्याला हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्याने दिडोंशी पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
सुभाष कांगणे यांना तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली आहे. त्यात ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. त्यांच्या पत्नीसह इतर कुटुंबियांची लवकरच जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्यांच्या आत्महत्येमागील अधिकृत कारणाचा खुलासा होणार आहे.