लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक सेवेतून कमी

निलंबनानंतर विभागीय चौकशीत दोषी आढळले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जून २०२६
मुंबई, – फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई युनिटच्या लाचलचुपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या वनराई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला आता सेवेतून कमी करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. संगमेश्‍वर गोपाळराव एकाळे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून याबाबतची नोटीस त्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आली आहे.

दिड वर्षांपूर्वी संगमेश्‍वर एकाळे यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांतील तक्रारदाराची एका व्यक्तीने फसवणुक केली होती. त्यांच्या वतीने तक्रारदारांनी वनराई पोलिसांत विरोधकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संगमेश्‍वर एकाळे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र तक्रार अर्ज प्राप्त होऊन त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांची भेट घेऊन विरोधक आरोपीची चौकशी करुन त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती.

यावेळी त्यांनी त्यांच्याकडे विरोधकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पाच हजाराची लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्यानंतर विरोधकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी संगमेश्‍वर एकाळे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. १९ ऑक्टोंबर २०२४ रोजी या तक्रारीची शहानिशा करण्यात आली होती. यावेळी संगमेश्‍वर एकाळे याने पाच हजाराची मागणी करुन अडीच हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरु होती. या चौकशीत त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांना आता पोलीस सेवेतून कमी ही शिक्षा देण्यात आली आहे. या शिक्षेचे आदेश त्यांना ५ जूनला देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page