मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ एप्रिल २०२४
मुंबई, – मध्य रेल्वेत नोकरीचे गाजर दाखवून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका अधिकार्याची सुमारे सहा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार भायखळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध भायखळा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनंत भागोजी बल्लाळ आणि श्रीलता अनंत बल्लाळ अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
५९ वर्षांचे तक्रारदार फारुख अहमद दादन हे माझगाव येथे राहत असून मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ऑटो इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतात. राजाराम रघुनाथ राऊळ हे त्यांचे सहकारी असून ते २०१३ साली मुंबई पोर्ट ट्रस्टमधून निवृत्त झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांची ओळख अनंत बल्लाळशी करुन दिली होती. अनंत हादेखील पूर्वी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला होता. सध्या तो निवृत्त झाला आहे. तो त्याच्या मुलाला रेल्वेमध्ये नोकरी देणार होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलालाही रेल्वेमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. अनंतची भेट घेतल्यानंतर त्याने त्यांच्या मुलांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या पत्नीचे काका सेंट्रल रेल्वेमध्ये कामाला असून ते त्यांच्या मुलाचे काम करणार असल्याचे सांगितले. याच दरम्यान अनंतने राजारामच्या मुलाच्या नियुक्तीचे पत्र दिले होते, त्यामुळे फारुख यांना त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी मुलाच्या नोकरीसाठी त्याला सहा लाख रुपये दिले होते. सप्टेंबर २०२२ रोजी अनंतने त्यांच्या व्हॉटअपवर त्यांच्या मुलाच्या नावाने सहाय्यक सचिव, रेल्वे रिक्रटमेंट बोर्ड, सेंट्रल रेल्वे विभागाचे सही आणि शिक्का असलेले नियुक्तीपत्र पाठविले होते. त्यानंतर त्याने त्यांना फोन करुन दोन ते तीन महिन्यांत त्यांचा मुलगा रेल्वेमध्ये रुजू होईल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याला नोकरी मिळाली नाही. अनंतला फोन केल्यावर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने नोकरीसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही.
अशा प्रकारे अनंत व त्याची पत्नी श्रीलता यांनी त्यांच्या मुलाच्या नोकरीसाठी सहा लाख रुपये घेऊन नोकरी न लावता, नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी या दोघांविरुद्ध भायखळा पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अनंत बल्लाळ आणि श्रीलता बल्लाळ यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस नियुक्तीपत्र देऊन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या पती-पत्नीने अशाच प्रकारे रेल्वेत नोकरी देतो असे सांगून इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.