मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2025
मुंबई, – मोबाईल घेऊन पळून गेला म्हणून एका 30 वर्षांच्या तरुणाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याच मोबाईलवरुन अशोक अविनाश तुळसे या तरुणाची त्यांच्याच परिचित पिता-पूत्राने हाताने आणि लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पिता-पूत्राला साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश भगवान दुनघव आणि लक्ष्मण सुरेश दुनघव अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता साकिनाका येथील काजूपाडा, सफेद पुलाजवळील सत्यनगर पाईप लाईन, चॉईस कंट्री बारसमोर घडली. आकाश अविनाश तुळसे हा 24 वषांचा तरुण साकिनाका येथील सफेद पुल, अशोकनगर चाळ क्रमांक दहामध्ये राहतो. मृत अशोक हा त्याचा मोठा भाऊ आहे. घुनघव कुटुंबिय हेदेखील याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. अशोकने सुरेश दुनघव यांचा मोबाईल घेऊन पलायन केले होते. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. शनिवारी रात्री आठ वाजता अशोक हा कंट्री बारससमोर होता. यावेळी सुरेश व त्याचा मुलगा लक्ष्मण दुनघव तिथे आले. यावेळी त्यांच्यात मोबाईल चोरीवरुन शाब्दिक बाचाबाची झाली होती.
रागाच्या भरात या दोघांनी अशोकला हाताने आणि लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्याला रस्त्यावर फेंकून दिले होते. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर आरोपी पिता-पूत्र तेथून पळून गेले होते. जखमी झालेल्या अशोकला स्थानिक रहिवाशांनी तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी आकाशची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुरेश आणि लक्ष्मण या पिता-पूत्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईलवरुन झालेल्या वादातून अशोकला आपला जीव गमवावा लागला होता. त्याच्या हत्येने परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.