मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – ऑनलाईन चालणार्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा काळाचौकी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी जेनी नावाच्या एका 26 वर्षांच्या वेश्यादलाल महिलेस पोलिसांनी अटक केली असून तिच्या तावडीतून चार तरुणीची सुटका केली आहे. या तरुणींना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. जेनीविरुद्ध भारतीय न्याय सहिता तसेच पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला नंतर पोलिसांनी अटक केली. ग्राहकांच्या मागणीनुसार जेनी ही विविध हॉटेलमध्ये या तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मुंबई शहरात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणार्या काही टोळ्या सक्रिय आहे. अशा टोळ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना जेनी नावाची एक महिला मिरा-भाईंदर परिसरात राहत असून तिच्या संपर्कात काही तरुणी आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार ती संबंधित तरुणींना ग्राहकांसोबत दादर, काळाचौकी आणि नागपाडा परिसरातील विविध हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेच्या मोबाईलवर बोगस ग्राहकाच्या मदतीने संपर्क साधला होता. जेनीकडे चार ते पाच तरुणींची मागणी करुन ग्राहकांनी या तरुणीचे फोटो व्हॉटअपवर पाठविण्यास सांगितले. त्यामुळे तिने त्याला चार तरुणीचे फोटो पाठवून प्रत्येकी तरुणीमागे तीस हजार रुपयांचा मोबदला घेणार असल्याचे सांगितले. त्यांच्यात फोनवरुन सर्व आर्थिक व्यवहार ठरला होता. त्यानंतर ग्राहकाने तिला तरुणींना घेऊन लालबाग परिसरातील एका हॉटेलमध्ये येण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता जेनी ही चार तरुणीसोबत हॉटेलमध्ये आली होती.
यावेळी तिचे बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना पोलीस निरीक्षक नंदकिशोर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा गायकवाड, महिला पोलीस शिपाई आश्विनी येवले, आरती इंगळे, योगिता डेरे, पोलीस शिपाई गोपाळ चव्हाण, शिंदे, खांडेकर या पोलीस पथकाने छापा टाकला होता. यावेळी जेनीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चारही तरुणींची सुटका केली. या तरुणींच्या चौकशीतून जेनी ही वेश्यादलाल असून वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान त्यांची तिच्याशी ओळख झाली होती. तिने तिच्या कामाची माहिती देऊन त्यांच्याकडून त्यांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. ती वेगवेगळ्या ग्राहकांसोबत त्यांना हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवत होती.
ग्राहकांकडून तीस हजार रुपये घेतल्यानंतर ती तरुणींना वीस हजार रुपये देऊन स्वतकडे दहा हजार ठेवत होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी जेनीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक केली होती. सुटका केलेल्या चारही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी कॅश, पाच मोबाईल सिमकार्ड आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. जेनीच्या संपर्कात अनेक तरुणींसह महिला असून ती ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना ग्राहकांसोबत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पाठवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.