चांगल्या परताव्याच्या आमिषाने वयोवृद्ध १.८९ कोटीची फसवणुक
शेअर गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्या चौकडीला अटक
अरुण सावरटकर
१३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – चांगल्या परताव्याच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका वयोवृद्धाची १ कोटी ८९ लाखांची फसवणुक करणार्या एका टोळीचा पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर विभागाने पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका चौकडीला पोलिसांनी अटक केली आहे. विठ्ठल लक्ष्मण वाघमोडे, नानासाहेब अरुण पारखे, अमोल शांतीलाल कुंभार आणि रमेश हरिबा लवंगारे अशी या चौघांची नावे असून ते चौघेही पुणे, पनवेलच्या कळंबोली, कामोठेचे रहिवाशी आहेत. फसवणुकीची ५३ लाख ३० हजाराची रक्कम विठ्ठल वाघमोडे याच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील तीन आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत केल्याचा या चौघांवर आरोपीवर आरोप असून अटकेनंतर सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील अशोककुमार शर्मा हे ७२ वर्षांचे वयोवृद्ध पश्चिम उपनगरात राहत असून सध्या निवृत्तीचे जीवन जगत आहेत. ७ सप्टेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल क्रमांक ७८६ विस्डम लॉच क्लब या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. या ग्रुपमध्ये शेअरमार्केटसंबंधित माहिती दिली जात होती. गु्रपमधील सदस्य विविध शेअरमध्ये गुंतवणुक करत होते. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत होता. याबाबतची माहिती ते सर्वजण ग्रुपवर स्क्रिनशॉटद्वारे देत होते. काही दिवसांनी ग्रुप ऍडमिनने तो शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग ऍपद्वारे ब्रोकिंग करत असल्याचे सांगून त्यांना शेअरमध्ये गंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर कमी वेळात त्यांना जास्त फायद्यासह चांगला परताव्याचे आश्वासन दिले होते.
त्यांच्या आमिषाला बळी पडून अशोककुमार शर्मा यांनी विविध शेअरमध्ये १ कोटी ८९ लाख २५ हजाराची गुंतवणुक केली होती. ही रक्कम त्यांनी नऊ वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड प्रॉफिट झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम परत न करता त्यांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केली होती. बोगस ऍपमध्ये खोटा नफा दर्शवून त्यांना शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
तपासात विठ्ठल फ्रुट सप्लायर या बँक खात्यात फसवणुकीची ५३ लाख ३० हजाराची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ते बँक खाते विठ्ठल वाघमोडे याचे होते. तो पुण्यात राहत असल्याने एक टिम पुण्याला पाठविण्यात आली होती. या पथकाने पुण्यातील इंदापूर, शिरसाटवाडी परिसरातून विठ्ठल वाघमोडे याला ताब्यात घेतले चहोते. त्याच्या चौकशीत नानासाहेब पारखे, अमोल कुंभार आणि रमेश लवंगारे या तिघांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही वेगवेगळ्य परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच फसवणुकीसाठी सायबर ठगांना वेगवेगळ्या बँकेत खाते उघडून दिले होते. या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना दिल्यानंतर वेगवेगळ्या फसवणुकीची रक्कम संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर होत होती.
याच बँक खात्यात संपूर्ण भारतातून इतर सोळा गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम त्यांनी कटातील मुख्य सायबर ठगांना दिली होती. त्यासाठी त्यांना लाखो रुपयांची कमिशन मिळाली होती. विठ्ठल वाघमोडे याला बँक खाते उघडण्यासाठी नानासाहेब पारखे मदत केली होती तर त्याची ओळख रमेश लवांगरे याने करुन दिली होती. या चौघांनी संगनमत करुन पैशांचा परस्पर अपहार केला होता. विठ्ठलने अमोल कुंभारच्या बँक खात्यात २० लाख तर रमेश लवांगरे याच्या बँक खात्यात २५ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.
या गुन्ह्यांत चौघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चारही आरोपींचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून या मोबाईलमधील माहिती काढण्याचे काम सुरु आहे.