अपहरणासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपींना अटक

समतानगर व दिडोंशी पोलिसांची धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – अपहरणासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना दिडोंशी आणि समतानगर पोलिसांनी अटक केली. सुकेन शिवसागर विश्‍वकर्मा आणि मोहम्मद मुस्तफा सय्यद अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यातील सुकेन गेल्या २९ वर्षांपासून तर मोहम्मद मुस्तफा हा ३० वर्षांपासून फरार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून विविध गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. या मोहीमेतर्गत गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या गुन्ह्यांतील काही आरोपींना अटक करणत पोलिसांना यश आले होते. ही मोहीम सुरु असताना समतानगर आणि दिडोंशी पोलिसांनी अशाच दोन वॉण्टेड आरोपींना अटक केली आहे. त्यात सुकेन विश्‍वकर्मा या आरोपीचा समावेश होता. १९९७ साली त्याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांनी अपहरणासह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या २९ वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

ही शोधमोहीम सुरु असताना सुकेन हा कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, जिवाला पाडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अंकुश गायकवाड, भिमेश कोटला, पोलीस हवालदार पाटील, लोखंडे, पोलीस शिपाई रेड्डी यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती तोच अपहरणासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी सुकेन विश्‍वकर्मा असल्याचे उघडकीस आले होते. गेल्या २९ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीस अखेर पोलिसांनी गजाआड केले.

दुसर्‍या कारवाईत दिडोंशी पोलिसांनी मोहम्मद मुस्तफा याला अटक केली. तो वांद्रे येथील बेहरामपाडा, लाकडावाला गल्लीत राहत होता. १९९५ साली त्याच्याविरुद्ध दिडोंशी पोलीस ठाण्यात लैगिंक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यांच्या वेळेस तो विधीसंघर्ष बालक होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध बाल कोर्टाने सर्च वॉरंट जारी केले होते. त्याच्या अटकेसाठी दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने वांद्रे परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

तो तिथे अधूनमधून येत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह दुकानदार, कारखानादार, मालक तसेच इतर तांत्रिक माहितीवरुन त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मोहम्मद मुस्तफाला अखेर ३० वर्षांनी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस हवालदार घुर्गे, पोलीस शिपाई पाटील, महिला पोलीस शिपाई सोनावणे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page