ताज-ट्रिडेंड हॉटेलला पुन्हा धमकीच्या कॉलने तणाव

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संशयित पोलिसांच्या ताब्यात

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – दक्षिण मुंबईतील नामांकित ताज आणि ट्रिडेंट हॉटेलला पुन्हा धमकीचा कॉल प्राप्त झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धमकीनंतर दोन्ही हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली असून प्रत्येक संशयितांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान संभाव्य हल्ल्याची धमकी देणार्‍या एका संशयिताला गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी कुलाबा पोलिसांकडे सोपविण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.

दक्षिण मुंबईतील ताज हॉटेल नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेट असते. यापूर्वी 26/11 आत्मघाती हल्ल्यात ताजमध्ये दहशतवाद्यांनी अमानुष गोळीबार करुन अनेक निरपराध लोकांची हत्या केली होती. त्यानंतर ताजमधील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली होती. सर्व काही सुरळीत सुरु असताना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता ताज हॉटेलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने स्वतचे नाव सांगितले नाही, मात्र ताजसह ट्रिडेंट हॉटेलमध्ये संभाव्य हल्ला होणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने कॉल बंद केला होता. ही माहिती ताज हॉटेलच्या अधिकार्‍यांकडून प्राप्त होताच त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली होती.

धमकी देणार्‍या व्यक्तीच्य अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश कुलाबा पोलिसांसह गुन्हे शाखेला देण्यात आले होते. या आदेशानंतर ज्या मोबाईल क्रमांकावरुन धमकीचा कॉल आला होता, या कॉलची माहिती काढण्यात आली होती. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी संतोष सावंत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 42 वर्षांचा संतोष हा नवी मुंबईतील नवीन पनवेल, भिंगारकरवाडी विचुंबे ग्रामपंचायतचा रहिवाशी असून तो हाऊसकिपिंगचे काम करतो.

त्यानेच ताज हॉटेलमध्ये संभाव्य हल्ल्याचा धमकीचा कॉल केला होता. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी कुलाबा पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. त्याची रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून काही गोष्टींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. संतोषची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याने कोणाच्या सांगण्यावरुन हा कॉल केला होता. कॉल करण्यामागे त्याचा काय उद्देश होता, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे धमकीचे कॉल केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page