लोलापलोझा कॉर्न्स्टमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांची हातसफाई
बारा लाखांच्या पाच सोनसाखळी चोरीच्या घटनेने खळबळ
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जानेवारी 2026
मुंबई, – लोलापलोझा कॉर्न्स्ट कार्यक्रमांत असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी चांगलीच हातसफाई केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कार्यक्रमांत सहभागी झालेल्या पाचजणांचे सुमारे बारा लाखांच्या पाच सोनसाखळी चोरट्याने पळवून नेली. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली असून कार्यक्रमांच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. कार्यक्रमांत इतर काही लोकांची सोनसाखळी किंवा मोबाईल चोरीस गेले आहेत का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेने कार्यक्रमांत सहभागी झालेल्या लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री पावणेदहाच्या सुमारास ताडदेव येथील महालक्ष्मी रेसकोर्समध्ये घडली. अभिषेक किशोर जवारकर हे गोरेगाव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. शनिवारी ताडदेव येथील महालक्ष्मी रेसकोर्समध्ये लोलापलोझा कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांसाठी अभिषेक जवारकर आले होते. कार्यक्रम सुरु होईपर्यंत तिथे प्रचंड गर्दी होती, याच गर्दीचा फायदा काही चोरट्याने घेतला होता.
कार्यक्रमादरम्यान त्यांच्या गळ्यातील सव्वादोन लाखांची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने पळविली होती. हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आले होते. चौकशीनंतर त्यांच्यासह इतर चौघांचे सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. त्यात आरव राहुल मनावत व निखिल शिवदास राठोड यांची अनुक्रमे यांची 2 लाख 20 हजार रुपयांची सोळा ग्रॅम, पार्थ अतुल चंपानेरकर यांची अडीच लाखांची वीस ग्रॅम, क्षितीज अनिल अंबादे यांची तीन लाखांची बावीस ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्याने पळविली होती. या पाचही घटनेत चोरट्याने 12 लाख 10 हजार रुपयांची 88 ग्रॅम वजनाच्या पाच सोनसाखळी चोरी केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच या पाचजणांनी ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. कार्यक्रमांतील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत पाचजणांनी त्यांची सोनसाखळी चोरीची तक्रार पोलिसांत केली असून आणखीन काही व्यक्तींचे सोने किंवा मोबाईल चोरीस गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाच घटना वगळता इतर काही गुन्हे घडले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.