मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या घटनेत सात आणि तेरा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करुन विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तिन्ही घटना गोरेगाव, सायन आणि वरळी परिसरात घडल्या असून स्थानिक पोलिसांनी तीन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून एका आरोपीस अटक केली तर पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिल्या घटनेत एका सात वर्षांच्या मुलीचा तिच्याच परिचित ४६ वर्षांच्या व्यक्तीने विनयभंग केला. ३८ वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून सात वर्षांची बळीत तिची मुलगी आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजता ती तिच्या मैत्रिणीसोबत घरासमोर खेळत होती. यावेळी त्याच परिसरात राहणारा तिचा परिचित आरोपीने तिला आईस्क्रिम देतो असे सांगून त्याच्या घरी आणले. तिच्याशी अश्लील चाळे करुन त्याने तिचा विनयभंग केला. तिच्या ओठावर जोरात चावा घेतल्याने त्यातून रक्त येऊ लागले. तिच्या गुप्त भागावर अश्लील चाळे केले होते. घरी आल्यानंतर या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. या घटनेनंतर तिने आरे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून ४६ वर्षांच्या आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपीस त्याच्या राहत्या घरातून अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसरी घटना सायन हॉस्पिटलमध्ये घडली. तेरा वर्षांची बळीत मुलगी मिरा-भाईंदरची रहिवाशी आहे. रविवारी १० नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात वाजता ती सायन हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक २२ जवळ होती. यावेळी कुलदीप बजरंगी सोनी या आरोपीने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या नातेवाईकांना सांगताच त्यांनी त्याच्याविरुद्ध सायन पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच कुलदीप सोनी याला पोलिसांनी अटक केली. तपासात कुलदीप हा तिथे असताना त्याने बळीत मुलीवर पाळत ठेवून नंतर तिचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. तो धारावीचा रहिवाशी असून व्यवसायाने रिक्षाचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिसरी घटना वरळी परिसरात उघडकीस आली. दुकानात फुगे आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. ही मुलगी वरळी येथे राहत असून मंगळवारी १२ नोव्हेंबरला सायंकाळी साडेचार वाजता घराजवळील दुकानात फुगे आणण्यासाठी गेली होती. यावेळी आकाश नावाच्या तरुणाने तिला दुकानात बोलाविले. दुकानाच्या आत गेल्याने त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि पळत घरी आली होती. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या तक्रारदार आईला सांगितला. त्यानंतर तिची आई दुकानात गेली होती. यावेळी आकाश तेथून पळून गेला होता. या घटनेनंतर तिने हा प्रकार वरळी पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आकाशविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा घडल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.