मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2025
मुंबई, – मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून तसेच केस कर्तनासाठी सलोनमध्ये गेलेल्या न्हावीने अश्लील चाळे करुन दोन तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार विलेपार्ले आणि कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विलेपार्ले आणि विनोबा भावे नगर पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे.
तेरा वर्षांची बळीत मुलीग ही अंधेरी येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता ती विलेपार्ले येथील सहार रोडवरील एका चाळीसमोर खेळत होती. यावेळी तिथे तिच्याच परिचित दिलशाद नावाचा आरोपी आला. त्याने तिचा पाठलाग करुन तिला मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याशी लगट करुन तिचा विनयभंग केला होता. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने विलेपार्ले पोलिसांत दिलशादविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. बळीत मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. आरोपी वेल्डिंगचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसर्या घटनेत एका तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी कुर्ला येथे राहते. 18 डिसेंबर 2024 रोजी ही मुलगी हेअर कटींगसाठी एका सलोनमध्ये गेली होती. यावेळी शाहरुख नावाच्या न्हावीने तिच्याशी अश्लील संभाषण केले होते. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली. त्यामुळे तिने याबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. मात्र नंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने विनोबा भावे नगर पोलिसांना हा प्रकार सांगून शाहरुखविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकणी गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.