युटीएस अॅपवर बनविलेल्या बोगस रेल्वे पासवर लोकलमध्ये प्रवास
महिला प्रवाशासह बोगस पास बनविणार्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जानेवारी 2026
मुंबई, – युटीएस अॅपवर बनविलेल्या बोगस रेल्वे पासवर वसई-चर्चगेट असा एसी फर्स्ट क्लास डब्ब्यातून प्रवास करणार्या एका महिला प्रवाशाला शुक्रवारी रेल्वे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या महिलेला तिच्या मित्राने रेल्वेचा बोगस पास बनवून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या महिलेसह तिच्या मित्राविरुद्ध वांद्रे रेल्वे पोलिसांनी बोगस रेल्वे पास बनवून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रिती सुशील गुप्ता आणि अनुज किशोर गुप्ता अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले असून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी सांगितले.
दिपीका गोंगाला मूर्ती या अंधेरीतील पश्चिम रेल्वे कॉलनीत राहत असून भारतीय रेल्वेत मुख्य तिकिट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या स्पोर्ट स्कॉड, मुंबई सेंट्रल येथे मुख्य तिकिट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. वरिष्ठांच्या आदेशावरुन त्या चर्चगेट ते विरार लोकलमध्ये फिरती तिकिट तपासणीचे काम करतात. शुक्रवारी अकरा वाजता दिपीका मूर्ती या चर्चगेट ते विरार लोकलमध्ये काम करत होत्या. यावेळी फर्स्ट क्लासच्या महिलांचे तिकिटासह पासची तपासणी करताना तिला प्रिती गुप्ता नावाच्या एका महिलेने तिचे रेल्वे तिकिट मोबाईलमध्ये असलेल्या युटीएस क्रमांकावरुन दाखविले होते. तिच्याकडे चर्चगेट ते वसई असा एसी लोकलचा फर्स्ट क्लासचा पास होता. मात्र या पासबाबत संशय निर्माणघ झाल्याने तिने तिची चौकशी केली.
यावेळी तिने तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली होती. त्यामुळे तिला वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे तिने दाखविलेल्या रेल्वे पासची सिस्टीममध्ये तपासणी करण्यात आली होती. त्यात तिने असा कुठलाही पास काढला नसल्याचे उघडकीस आले. चौकशीदरम्यान तिने तिच्याकडील रेल्वेचा चर्चगेट-वसईचा रेल्वेचा पास बोगस असल्याचे सांगून तिला तो पास तिचा मित्र अनुज गुप्ता याने तिच्या मोबाईलच्या बोगस युटीएस अॅपवरुन बनवून दिल्याची कबुली दिली. त्यानंतर प्रिती गुप्ता आणि अनुज गुप्ता या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस रेल्वेचा पास बनवून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत या दोघांना ताब्यात घेतल्यांनतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले. सोमवारी या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार असून या चौकशीनंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी अशाच प्रकारे एका प्रवाशाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी बोगस रेल्वे पाससहीत अटक केली होती. चौकशीत त्याला त्याच्या मित्राने अॅपवर बोगस रेल्वे पास बनवून दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर शुक्रवारी वांद्रे पोलिसांनी एका महिला प्रवाशासह तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.