व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिट देणार्‍या टोळीचा पर्दाफाश

मुंबईसह गुजरात, उत्तरप्रदेशातून मुख्य आरोपीसह सहाजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जुलै २०२६
मुंबई, – बोगस लेटरहेड बनवून व्हीपीआय कोट्यातून रेल्वे तिकिट देणार्‍या एका टोळीचा मलबार हिल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबईसह गुजरात आणि उत्तरप्रदेशातून मुख्य आरोपीसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. अमरीश ईश्‍वरलाल ठक्कर, तारीक मेहफुज खान, दिपककुमार कन्हैयालाल यादव, विनय विक्रमसिंग रावत, सागर ईश्‍वरलाल ठक्कर आणि क्षत्रुंजय रामकुमार यादव ऊर्फ अनुप ऊर्फ मोहन अशी या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी बारा मोबाईल फोन, एक लॅपटॉप, सोळा सिमकार्ड, सत्तर क्रेडिट-डेबीट कार्ड, चारशेहून अधिक व्यक्तींची व्हीआयपी बुकींगसंदर्भातील गोपनीय माहितीचा डेटाबेस, दोन बोगस शिक्के, पाच आधारकार्ड, स्टॅम्प पॅण्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

विशाल सुधीर शिंदे हे वाळेश्‍वर येथील लोकभवन येथे राज्यपालाच्या परि सहाय्यक कार्यालनयात दौरा विभागात सहाय्यक म्हणून काम करतात. राज्यपालासह त्यांच्या कुटुंबियांचे विविध शहरातील दौर्‍याचे, प्रवासाचे नियोजन करणे, याबाबत आश्‍वयक ते कामकाजाची देखरेख करणे अशा त्यांच्या कामाचे स्वरुप आहे. त्यासाठी त्यांच्यासह इतर कर्मचार्‍यांचे रेल्वे प्रवाशाच्या व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिट आरक्षण करण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून रेल्वे विभागात विनंती अर्ज केला जात होता. ६ फेब्रुवारीला त्यांच्या कार्यालयात अशाच प्रकारे रेल्वे तिकिट कन्फर्मसाठी लोकभवनातून एक पत्र प्राप्त झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यात अभयसिंग देशमुख यांचे परि सहाय्यक म्हणून स्वाक्षरी तसेच त्यांचा नाव व पदाचा स्टॅम्प मारलेला होता.

या पत्राची शहानिशा केल्यांनतर लोकभवन येथून अशाच प्रकारे पत्र देण्यात आले नसल्याचे तसेच संबंधित व्हीआयपी कोट्यातून तिकिट कन्फर्मसंदर्भातील पत्र बोगस असल्याचे उघडकीस आले होते. पत्रात दिलेले मोबाईल क्रमांक बोगस होते. अज्ञात व्यक्तींनी लोकभवनाच्या बोगस लेटरचा वापर करुन काही प्रवाशांचे रेल्वे तिकिट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला होता.  या घटनेने तेथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत विशाल शिंदे यांना पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगून मलबार हिल पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करुन संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून लोकभवन कार्यालयाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुमन चव्हाण यांनी गंभीर दखल घेत मलबार हिल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर गोरवे, पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत मोहिते, अक्षय चौगुले, पोलीस हवालदार गुलाबखान पठाण, संतोष लोखंडे, राजेश सरवदे, रामेश्‍वर माचेवाड, पोलीस शिपाई सचिन चतुर, आशिष घोरपडे, सत्यवान राऊत, समीर भालेराव आणि जगदेश यांनी तपास सुरु केला होता.

संबंधित आरोपींनी बोगस लेटरहेड तयार करुन त्यावर खोटा मजकूर लिहून रेल्वे तिकिट व्हीआयपी कोट्यातून देण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित पत्र वेगवेगळ्या राज्यातून आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी या पथकाने मुंबईसह उत्तरप्रदेश, गुजरात राज्यात विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना वेगवेगळ्या परिसरात सहाजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या टोळीचा म्होरक्या अमरीश ठक्कर होता. त्यानेच काही रेल्वे एजंटच्या मदतीने बोगस लेटरहेडवर व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिट दिल्याचे उघडकीस आले होते. त्यासाठी या टोळीला काही ठराविक रक्कम कमिशन दिले जात होते. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यांतील साहित्यासह मोबाईल, लॅपटॉप तसेच ४०० हून अधिक व्यक्तीच्या व्हीआयपी रेल्वे बुकींगसंदर्भातील माहितीचा डेटाबेस जप्त केला आहे.

व्हीआयपी कोट्यातून तिकिट कन्फर्म करुन देणारी ही एक आंतरराज्य टोळी आहे. आरोपींच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या टोळीविरुद्ध यापूर्वी कुर्ला, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांचा ताबा लवकरच संबंधित पोलिसांकडे सोपविला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page