19 वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या रॉबरीच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक

जामिनावर बाहेर येताच पळून गेला व माहीम येथे सापडला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 जून 2026
मुंबई, – गेल्या 19 वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणारा रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस खार पोलिसांनी अटक केली. हनीफ मुराद फकीर असे या 42 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध तीन वर्षांपूर्वी वांद्रे येथील लोकल कोर्टाने जाहीरनामा जाहीर केला होता. अखेर 19 वर्षांनी तो माहीम दर्गा परिसरात पोलिसांना सापडला. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

हनीफ फकीर हा माहीम येथील मोरी रोड परिसरात राहत होता. 2007 साली त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी रॉबरीच्या एका गुन्ह्यांची नोंद केली होती. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हनीफसह त्याच्या इतर सहकार्‍याला पोलिसांनी शिताफीने अटक केली होती. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने त्याच्या वकिलामार्फत वांद्रे येथील लोकल कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्याला जामिन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेला होता.

तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्याची लोकल कोर्टाने गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध जून 2023 रोजी जाहीरनामा जाहीर केला होता. त्याच्या अटकेसाठी खार पोलिसांना विशेष आदेश दिले होते. या आदेशानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गेल्या 19 वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना हनीफ फकीर हा माहीम दर्गा परिसरात येणार असल्याची माहिती खार पोलिसांच्या निगराणी व तडीपार पथकाला मिळाली हाती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भिमराव धापटे, पोलीस हवालदार गुरव, पोफळे, पवार, माने, पोलीस शिपाई ठोंबरे यांनी माहीम दर्गा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या हनीफला पोलिसांनी शिताफीने अटक केली. चौकशीनंतर तोच रॉबरीच्या गुन्ह्यांतील गेल्या 19 वर्षांपासून फरार आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page