पोलीस भरतीच्या बहाण्याने सात लाखांची फसवणुक

निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जून 2025
मुंबई, – पोलीस भरतीच्या बहाण्याने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एका कर्मचार्‍याची सुमारे सात लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेला निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामसिंग बाळा डोलगे याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रामसिंग हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील तीन विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्याने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

वैभव रोहिदास तरे हे महाराष्ट्र सुरक्षा बल विभागात कामाला आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत पालघरच्या सफाळे, उबंरपाड्यात राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांची निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामसिंग डोलगे आणि हसमुख वाघेला यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी त्यांना 2021 मध्ये पोलीस भरतीमध्ये त्यांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी वैभव तरे यांच्याकडून टप्याटप्याने सुमारे सात लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांचे पोलीस भरतीचे आश्वासन पूर्ण न करता, तसेच पोलीस भरतीसाठी घेतलेले पैसे परत केले नाही.

पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी त्यांना काही धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या दोघांविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर 20 सप्टेंबर 2024 रोजी रामसिंग डोलगे आणि हसमुख वाघेला यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु केला होता. तपाासत या दोघांनी पोलीस भरतीच्या नावाने वैभव तरे यांची फसवणुक केली होती. त्यांच्याकडून घेतलेल्या सुमारे सात लाखांचा अपहार केला होता. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते.

मात्र रामसिंग डोलगे हा पोलीस तपासात सहकार्य करत नव्हता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष माहीम सुरु केली होती. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या रामसिंग डोलगे याला गुरुवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

2023 साली रामसिंग हा मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाला असून सध्या तो नायगाव येथील पोलीस मैदानाजवळील बीडीडी चाळ, रुम क्रमांक आठमध्ये राहतो. रामसिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मिरारोड, कस्तुरबा मार्ग, मेघवाडी पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांत हसमुख विनोदभाई वाघेला हा सहआरोपी असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page