अरुण सावरटकर
10 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कारवाईदरम्यान जप्त केलेल्या बाईकचा अपहार करुन पलायन केलेल्या एका सराईत आरोपीस डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. मोहम्मद आसिफ शफी मंसुरी असे या आरोपीचे नाव असून त्याने क्यूआर कोडद्वारे दंडाची रक्कम जमा केली होती. याच कोडवरुन त्याचा सहभाग उघडकीस आला आणि त्याला पोलिसांनी गजाआड केले. आसिफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारे इतर काही गुन्हे असल्याचे बोलले जाते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अल्ताब करीम बेलदार हे वरळीतील पोलीस वसाहतीत राहत असून सध्या डी. एन नगर वाहतूक विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. 10 ऑगस्टला पोलीस हवालदार संतोष कांबळे यांनी एका बाईकवर कारवाई केली होती. या बाईकच्या मागच्या बाजूला असलेला नंबर प्लेट नव्हता. त्याचा चालक अनस खानकडे विचारणा केल्यानंतर त्याने ती बाईक त्याची पत्नी शबीना हिच्या नावावर असल्याचे सांगून बाईकचे सर्व कागदपत्रे आणि नंबर प्लेट घरी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला सर्व कागदपत्रे घेऊन येण्यास सांगून बाईक डी. एन नगर वाहतूक विभागात जमा केली होती.
मात्र अनस खान हा बाईकचे कागदपत्रे घेऊन आला नाही. 14 ऑगस्टला सायंकाळी अल्ताब बेलदार हे वाहतूक विभागात काम करत होते. यावेळी तिथे दोनजण आले. त्यांनी बाईकचे नंबर प्लेट देऊन ते शबीना खान हिचे नातेवाईक असल्याचे सांगितले. त्यांनी दंडाची दोन हजाराची रक्कम जमा केली होती. त्यानंतर त्यांनी त्याला दंडाची पावतीसह जमा केलेली बाईक ताब्यात दिली होती. 18 ऑगस्टला अनस खान हा वाहतूक विभागात आला, त्याने जप्त केलेल्या बाईकचे कागदपत्रे आणि नंबर प्लेट सादर केले. यावेळी अल्ताब बेलदार यांनी त्यांचे नातेवाईक दंडाची रक्कम जमा करुन बाईक घेऊन गेल्याचे सांगितले. यावेळी त्याला वाहतूक विभागाचे सीसीटिव्ही फुटेज दाखविण्यात आले. या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर अनस खानने ते दोघेही त्याचे नातेवाईक नसल्याचे सांगितले.
या दोघांनी दंडाची रक्कम भरुन जप्त केलेली बाईक पळवून नेली होती. हा प्रकार अल्ताब बेलदार यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितला. त्यांच्या आदेशावरुन त्यांनी डी. एन नगर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार संबंधित दोन्ही तोतया नातेवाईकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. क्यूआर कोडद्वारे संबंधित आरोपीने दंडाची रक्कम भरली होती, त्यामुळे या व्यवहाराची माहिती वरिष्ठ कार्यालयातून पत्रव्यवहार करुन मागविण्यात आली होती. त्यात ही रक्कम मोहम्मद आसिम याने भरल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना मोहम्मद असिमला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच दंडाची रक्कम भरुन वाहतूक विभागात कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या बाईकचा अपहार करुन पलायन केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. आतापर्यंतच्या चौकशीत मोहम्मद आसिफ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात अशाच एका गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली.
तो वाहतूक विभागात कारवाईदरम्यान जप्त केलेल्या वाहनांची रेकी करत होता. रेकीनंतर तो वाहनांचे बोगस कागदपत्रे बनवून वाहतूक विभागात जाऊन संबंधित वाहन त्याच्या नातेवाईक असल्याचे सांगत होता. तिथे दंडाची रक्कम जमा करुन तो संंबंधित वाहन घेऊन पळून जात होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.