ऑनलाईन फसवणुकीमुळे सतरा वर्षांच्या मुलाने स्वतचे जीवन संपविले
अकरा महिन्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – जानेवारी महिन्यांत जोगेश्वरी रेल्वे स्थानकात झालेल्या सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा अपघाती निधन झाले नसून ऑनलाईन फसवणुकीमुळे मानसिक नैराश्यातून त्याने लोकलखाली उडी घेऊन स्वतचे जीवन संपविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे एडीआरची नोंद झालेल्या या गुन्ह्यांच्या कलमांत बदल करण्यात आला आहे. आता या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आठजणांविरुद्ध अंधेरी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. टास्कच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून या टोळीने मृत तरुणाची सुमारे 49 हजाराची ऑनलाईन फसवणुक केली होती. या फसवणुकीमुळे तो मानसिक तणावात होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे निष्पन्न झाले आहे.
निलेश गजानन चौगुले हे जोगेश्वरीतील मेघवाडी, जुम्मनखान चाळीत त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत राहत असून ते चालक म्हणून काम करतात. विघ्नेश हा त्यांचा सतरा वर्षांचा मुलगा असून तो श्री मुंबादेवी ज्युनिअर कॉलेज कॉमर्स अॅण्ड सायन्स या कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. तसेच जोगेश्वरीतील सर्वोदयनगर परिसरात असलेल्या दिपक क्लासेसमध्ये एक्स्ट्रा क्लासाठी जात होता. दहावी पास झाल्यानंतर त्याला निलेश चौगुले यांनी एक मोबाईल दिला होता. या मोबाईलमध्ये त्याने वेगवेगळे सोशल मिडीया अकाऊंट उघडले होते. 21 जानेवारी 2025 रोजी तो नेहमीप्रमाणे क्लासला जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र रात्री दहापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे चौगुले कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एका मुलाचा लोकल अपघात झाल्याची माहिती निलेश चौगुले यांना मिळाली होती. या माहितीनंतर ते त्यांच्या मित्रांसोबत कूपर हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्यांना मृत मुलगा त्यांचा विघ्नेश असल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांची अंधेरी रेल्वे पोलिसांनी जबानी नोंदविली होती. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. अपघातात त्याचा मोबाईल फुटला होता. तो दुरुस्त करुन नंतर रेल्वे पोलिसांना देण्यात आला होता. तपासात विघ्नेशची व्हॉटअप आणि टेलिग्राम या सोशल मिडीया अॅपमधून फसवणुक झाल्याचे उघडकीस आले होते.
ऑनलाईन रेटींग टास्कचे पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन त्याला वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यात आले होते. त्यात त्याला सुरुवातीला काही कमिशन देण्यात आले होते. नंतर त्याच्याकडून प्रत्येक टास्कसाठी पैसे घेण्यात आले होते. या टास्कसाठी त्याने 49 हजाराची गुंतवणुक करुन संबंधित सर्व टास्क पूर्ण केले होते. मात्र टास्क पूर्ण करुनही त्यांनी त्याला पैसे परत केले नव्हते. ऑनलाईन टास्कच्या नावाने अज्ञात सायबर ठगांनी त्याची फसवणुक केली होती. त्यातून त्याला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते.
याच नैराश्यातून त्याने जोगेश्वरी रेल्वे स्थानकात लोकलखाली आत्महत्या केली होती. त्याची टेलिग्राम अकाऊंट युझर नेहा अग्रवाल ऊर्फ शर्मा, डॉरिस सेठ, किरण राव पंडित यांच्यासह इतर पाचजणांची फसवणुक केली होती. ही माहिती नंतर निलेश चौगुले यांना देण्यात आली होती. या माहितीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित आठही आरोपीविरुद्ध अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी विघ्नेशची आर्थिक फसवणुक करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा अंधेरी रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. अकरा महिन्यानंतर विघ्नेशच्या आत्महत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.