बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीसाठी घेतलेल्या 31 कोटीचा अपहार
अंधेरीतील पिता-पूत्र बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 डिसेंबर 2025
मुंबई, – जोगेश्वरीतील एका बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीसाठी घेतलेल्या सुमारे 31 कोटीचा अपहार करुन एका फार्मा व्यावसायिकासह वीसजणांची बिल्डर पिता-पूत्राने फसवणुक केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जयकुमार गुप्ता व सुयश जयकुमार गुप्ता या बिल्डर पिता-पूत्राविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही रणबीर रियल इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्स या बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीचे मालक आणि संचालक आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही पिता-पूत्राची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
महेश हकीमचंद दोशी हे 71 वर्षीय वयोवृद्ध तक्रारदार अंधेरी येथे राहत असून त्यांचा डायमेक फार्मा नावाची गुजरातच्या वापी शहरात ब्लक ड्रग्ज बनविण्याची कारखाना आहे. मार्च 2021 रोजी त्यांना काही चांगल्या प्रकल्पात गुंतवणुक करायची होती. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांच्या परिचित आदिती कन्स्ट्रक्शनचे चिराग शहा यांनी त्यांना रणबीर रियल इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीविषयी माहिती दिली होती. या कंपनीकडून जोगेश्वरी येथे काही पुर्नविकास प्रकल्प सुरु आहे. याच प्रकल्पात त्यांनी गुंतवणुक करावी असा सल्ला देत त्यांना गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल असे सांगितले होते.
कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील सर एम. व्ही रोड, शिवछाया अपार्टमेंटमध्ये होते. त्यामुळे त्यांनी कंपनीचे मालक आणि संचालक असलेल्या जयकुमार आणि सुयश यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी त्यांची कंपनी दोन दशकापासून रियल इस्टेट, बांधकाम आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायात कार्यरत आहे. त्यांच्या कुटुंबियांचा हाच व्यवसाय असून त्यात त्यांच्यासह त्यांचा मुलगा संचालक म्हणून काम पाहतो असे सांगितले. सध्या त्यांच्या कंपनीकडून जोगेश्वरीतील मेघवाडी, सर्वोदयनगर रोडवर पुर्नविकासाचे काम सुरु असून तिथे तीन इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यापैकी इमारतीमध्ये 215 फ्लॅटधारक आणि सहा गाळेधारकाचे पुर्नविकास होणार आहे.
उर्वरित दोन्ही इमारतीची मालकी हक्क त्यांच्या कंपनीकडे आहे. इमारतीमधील फ्लॅट आणि गाळे विक्री करुन त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा किंवा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रकल्पात आर्थिक गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. चर्चेदरम्यान जयकुमार आणि सुयशने त्यांना प्रकल्पात गुंतवणुक केल्यानंतर त्यांना अठरा टक्के व्याज देण्याचे आश्वासन देताना दर तीन महिन्यानंतर व्याजाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून महेश दोशी यांच्या त्यांच्या कुटुंबियांनी 6 एप्रिल 2021 ते 26 मे 2023 या कालावधीत या कंपनीत टप्याटप्याने 8 कोटी 26 लाखांची गुंतवणुक केली होती. करारानुसार त्यांनी त्यांना दर तीन महिन्यानंतर व्याजाची रक्कम दिली होती.
मार्च 2021 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत त्यांच्याकडून व्याजाची रक्कम मिळत असल्याने त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर त्यांनी व्याजाची रक्कम ट्रान्स्फर करणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर जयकुमार आणि सुयश यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे दिले नाही. चौकशीदरम्यान त्यांना त्यांनी त्यांच्या प्रकल्पातील फ्लटधारकासह गाळाधारकांना त्यांच्या फ्लॅट व गाळ्याचा ताबा दिला होता. उर्वरित दोन इमारतीचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले होते. त्यातील काही फ्लॅटची त्यांनी विक्री केली होती.
या विक्रीतून त्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला होता. तरीही त्यांनी त्यांची गुंतवणुक रक्कम परत केली नाही. जयकुमार व सुयश यांनी त्यांच्यासह त्यांच्या परिचित आणि इतर अठरा लोकांकडून प्रकल्पात गुंतवणुकीसाठी पैसे घेतले होते, या सर्वांना चांगला परतावा किंवा फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काही महिने परताव्याची रक्कम दिल्यानंतर त्यांना उर्वरित रक्कम देणे बंद केले होते. अशा प्रकारे त्यांनी वीसहून अधिक लोकांकडून 31 कोटी 26 लाख रुपये घेऊन या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच महेश दोशी यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित दोन्ही संचालकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर जयकुमार गुप्ता आणि सुयश गुप्ता या दोघांविरुद्ध अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलिसांनी सुरु केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. त्यांची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.