व्यापार्याच्या घरातील 18.60 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश
मुलीनेच प्रियकराच्या मदतीने चोरी केल्याचे तपासत उघडकीस
अरुण सावरटकर
7 डिसेंबर 2025
मुंबई, – सांताक्रुज येथील एका किराणा मालाचा व्यापार्याच्या घरी झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात सांताक्रुज पोलिसांना यश आले आहे. तक्रारदार व्यापार्याच्या मुलीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने अठरा लाख साठ हजार रुपयांची कॅश आणि विविध सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. रविंद्र नारायण निरकर आणि निकिता धनजी हाथियानी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने बुधवार 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निकिताचे रविंद्रसोबत प्रेमसंबंध होते, या दोघांना विवाह करायचा होता, वैवाहिक आयुष्य सुखी राहावे यासाठी पैशांची गरज असल्याने निकिताने रविंद्रला तिच्याच घरी चोरी करण्याचा सल्ला दिल्याचे तपासात उघडकीस आले होते, मात्र पोलिसांनी चोरीचा पर्दाफाश करुन या दोघांनाही अटक केली. या दोघांनी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धनजी हरजी हाथियानी हे मूळचे गुजरात्या कच्छ, रापरच्या कानपरचे रहिवाशी असून व्यवसायाने व्यापारी आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते त्यांची पत्नी तेजी, मुलगी निकिता आणि मुलगा केतन यांचयासोबत सांताक्रुज परिसरात राहतात. त्यांचा तिथेच गणेश ट्रेडिंग कंपनी नावाचा किराणा मालाचे एक दुकान आहे. 17 ऑक्टोंबरला त्यांना दुकानाच्या उत्पनातून सहा लाख रुपये मिळाले होते तर त्यांनी त्यांच्या गावच्या वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीचा व्यवहार करुन त्यातून त्यांना सहा लाख रुपये मिळाले होते. बारा लाखांची ही कॅशसहीत कुटुंबातील विविध सोन्याचे दागिने घरातील बेडरुमच्या धातूच्या डब्ब्यात ठेवले होते.
18 ऑक्टोंबर दुपारी चार वाजता त्यांची पत्नी तेजी ही मुलगी निकितासोबत मार्केटमध्ये गेली होती. साडेपाच वाजता त्या दोघीही मार्केटमधून घरी आल्या. यावेळी त्यांना त्यांचा दरवाजा उघडा दिसून आला. त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले होते. त्यामुळे बेडरुमच्या धातूचा डब्बा शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला कुठेच तो डब्बा सापडला नव्हता. त्यामुळे तिने हा प्रकार धनजी हाथियानी यांना सांगितला. ही माहिती समजताच ते त्यांच्या घरी आले. या दोघांनी संपूर्ण घरात धातूचा डब्बा शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कुठेच डब्बा सापडला नाही. त्यात बारा लाखांची कॅश आणि विविध सोन्याचे दागिने असा अठरा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. हा मुद्देमालच घरात प्रवेश केलेल्या अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी तक्रारदार धनजी हाथियानी यांची मुलगी निकिता आणि रविंद्र निरकर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत निकिताचे रविंद्र निरकरशी प्रेमसंबंध होते. या दोघांना लग्न करायचे होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना लग्न करता येत नव्हते. वैवाहिक आयुष्य सुखी होण्यासाठी तिनेच रविंद्रच्या मदतीने तिच्या घरी चोरीची योजना बनविली होती. बेडरुमच्या धातूच्या डब्ब्यात बारा लाखांची कॅशसहीत काही दागिने असल्याची माहिती निकिताने रविंद्रला दिली होती. ठरल्याप्रमाणे कोणालाही संशय येऊ नये म्हणून 10 ऑक्टोंबरला ती तिच्या आईसोबत मार्केटमध्ये गेली होती. याबाबत तिने रविंद्रला आधीच कल्पना दिली होती. त्या दोघीही मार्केटमध्ये गेल्यानंतर रविंद्र हा त्यांच्या घरी गेला होता. त्याने बारा लाखांची कॅश आणि तेरा तोळे असलेले बेडरुममधील धातूचा डब्बाच चोरी करुन तेथून पलायन केले होते.
तपासात ही माहिती उघडकीस येताच या दोघांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर निकिता आणि रविंद्र या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.