रागातून बघितल्याच्या संशयावरुन तरुणावर प्राणघातक हल्ला

चारही आरोपी अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जानेवारी 2026
मुंबई, – रागातून बघितल्याच्या संशयावरुन दोन तरुणांवर चार अल्पवयीन मुलांनी तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात वरुण जगदीश सोळंकी आणि श्रीपाल सिंग असे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिनाज या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पंधरा ते सोळा वयोगटातील चारही अल्पवयीन आरोपी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अल्वयीन असल्याने या चौघांनाही डोगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजता भांडुपच्या जंगलमंगल रोड, अभ्युदय बॅकेसमोरील सुचित बारजवळ घडली. वरुण सोलंकी हा सुभाषनगर, म्हाडा कॉलनीत राहत असून सध्या तो कॉलेजमध्ये शिकतो. सोमवारी रात्री वरुण हा त्याचे मित्र श्रीपाल सिंग आणि ऋषभ यादव यांच्यासोबत त्याच्या स्कूटीवरुन जात होता. सुचित बारजवळून जात असताना तिथे उपस्थित असलेल्या चारही अल्पवयीन मुलांना वरुणने त्यांच्यावर रागातून बघितल्याचा संशय झाला होता.

याच कारणावरुन वरुणला या चारही मुलांनी जाब विचारुन त्याच्याशी वाद घालण्यचा प्रयत्न केला होता. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु असताना या आरोपीसह इतर सात ते आठजणांनी त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात वरुणसह त्याचा मित्र श्रीपालच्या छातीवर, पाठीवर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर ते सर्वजण पळून गेले होते. जखमी झालेल्या दोघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने मिनाज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वरुणच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्वांना नंतर डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत इतर तीन ते चारजण फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रागातून बघितल्याच्या संशयावरुन झालेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page