अरुण सावरटकर
15 फेब्रुवारी 2026
मुंबई, – अंधेरीतील एका वयोवृद्ध व्यावसायिकाच्या घरी झालेल्या सुमारे 50 लाख रुपयांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात आंबोली पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे बोलले जाते. सूर्यमनी नाडर, जयवंत चरसिंग पवार आणि सूर्या कडवी मुदलीयार अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अंधेरीतील आरटीओ लेन, चार बंगला, जीबीएस टीचर कॉलनीत घडली. या कॉलनीतील बी/7 मध्ये जोएल क्लेमंट रॉड्रिक्स हे 65 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा व्हिंटेज कारचा व्यवसाय असून त्यांना दोन मुले आहे. मोठा मुलगा रिक कॅनडा तर दुसरा मुलगा रायन हा दिल्लीत राहतो. रायनचे लग्न ठरल्याने ते त्यांच्या पत्नीसोबत 7 फेब्रवुारी दुपारी तीन वाजता जयपूर येथे विवाहासाठी पॅलेस बुक करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटला व्यवस्थित कुलूप लावले होते. त्यांच्या फ्लॅटची एक चावी त्यांचा कर्मचारी सुनिल कांबळे याच्याकडे होती. तो मोलकरणीला कामासाठी फ्लॅट उघडून देत होता. तिचे काम संपल्यानंतर तो फ्लॅट बंद करुन जात होता.
10 फेब्रुवारी सकाळी पावणेबारा वाजता सुनिल कांबळे हा फ्लॅटवर आला होता. यावेळी त्याला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने खिडकीचे ग्रिल तोडून आत प्रवेश केला होता. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. चारही कपाटातील लॉक तुटलेले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हीम ाहिती त्याचे मालक जोएल रॉड्रिक्स यांना दिली होती. त्यानतर ते त्यांच्या पत्नीसोबत जयपूर येथून मुंबईत आले होते. कपाटातील दागिन्यांची पाहणी केल्यानंतर त्यांना विविध हिरेजडीत, सोन्याचे दागिने, महागडे घड्याळ व इतर साहित्य असा सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती आंबोली पोलिसांना दिली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सूर्या मुदलीयार या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच त्याच्या इतर दोन सहकार्यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी सूर्यमनी नाडर आणि जयवंत पवार या दोघांन ताब्यात घेतले होते. या तिघांनी ही घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.