आर्थिक मदतीच्या बहाण्याने गंडा घालणार्या भामट्याला अटक
मृत रुग्णांच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या प्रकाराने संतापाची लाट
अरुण सावरटकर
16 फेब्रुवारी 2026
मुंबई, – दोन वर्षांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या आणि उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या परिचित मित्राला लायन्स क्लब ऑफ मुंबईमार्फत दोन लाखांची आर्थिक मदतीच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा घालणार्या एका सराईत भामट्याला माहीम पोलिसांनी अटक केली. आतिश विक्रम खेडकर ऊर्फ सुरेश पांडे असे या भामट्याने नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ऑनलाईन फसवणुक करणारा अतिश खेडकर हा सराईत गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे सात ते आठजणांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला सुश्रुषा हॉस्पिटलमधून कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृत रुग्णांच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या या प्रकाराने प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
42 वर्षांचे गौरव कृष्ण मेहेर हे माहीमच्या फिशरमन कॉलनीत राहत असून माहीमच्या एका आयटी कंपनीत कामाला आहेत. 11 फेब्रुवारी 2026 रोजी ते त्यांच्या कार्यालयात होते. यावेळी त्यांना सुरेश पांडे नाव सांगणार्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो दादरच्या सुश्रुशा हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे सांगितले. 5 फेब्रुवारी 2024 रोजी याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्या एका मैत्रिणीला अपघातानंतर अॅडमिट करण्यात आले होते, तिथे उपचारादरम्यान 4 मार्च 2024 रोजी तिचा मृत्यू झाला होता. त्याचाच दाखला देऊन सुरेश पांडेने त्यांची मैत्रिण हॉस्पिटलमध्ये दाखल असताना त्यांची धडपड पाहिली होती. तुम्ही तिची प्रचंड काळजी घेत होता. त्यावेळेस तो हॉस्पिटलच्या ब्लॅक बँकमध्ये काम करत होता. हॉस्पिटलला लायन्स क्लब ऑफ मुंबई यांच्यामार्फत रुग्णांसाठी वीस लाख रुपयांचा फंड आला आहे.
या फंडाचे प्रत्येकी दोन लाख रुपयांची रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना द्यायचे आहे. त्यात त्यांची केस असून तुम्हाला तुमच्या मैत्रिणीच्या निधनानंतर दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मात्र त्यांनी ती रक्कम घेण्यास नकार दिला. मात्र तो त्यांना ती रक्कम घेण्यासाठी सतत दबाव आणत होता. या प्रकारानंतर गौरव मेहेर यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या बहिणीला कॉल करुन ही माहिती दिली. मात्र तिनेही ती रक्कम घेण्यास नकार देत ती रक्कम इतर रुग्णांना मदत करण्याची विनंती केली होती. याबाबत त्यांनी सुरेश पांडेला सांगितले होते. मात्र तो सतत त्यांना कॉल करत होता. ही रक्कम मिळविण्यासाठी त्यांना दहा हजार रुपये रजिस्ट्रेशन फी म्हणून भरावी लागेल असे सांगितले. त्यासाठी त्याने त्यांना एका बँकेचा पासबुकचा फोटो पाठविला होता. त्यात बँक खातेदाराचा क्रमांक तसेच त्याचे नाव आतिश खेडकर असल्याचे दिसून आले.
याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना अतिश खेडकर हे त्यांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांतिले. त्यानंतर त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात दहा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्याने त्याची पावती त्यांना मेलवरुन पाठविली होती. त्यात ती पावती सुश्रुषा हॉस्पिटलमधून आल्याचे त्यांना खात्री झाली होती. दुसर्या दिवशी सुरेश पांडेने त्यांना पुन्हा कॉल करुन त्यांना जीएसटी टॅक्स म्हणून वीस हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच गौरव मेहेर यांनी त्यांचा मित्र सोन करुनामूर्ती याला सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. लायन्स क्लबमार्फत आलेल्या फंडाविषयी चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी तिथे जाऊन चौकशी केली हाती.
त्यात त्याला अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा फंड आला नाही. असा मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना देण्यात नसल्याचे समजले होते. सुरेश पांडे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या मृत मैत्रिणीच्या नावाने त्यांना आर्थिक मदत म्हणून दोन लाख रुपये देतो असे सांगून त्यांची ऑनलाईन फसवणुक केली होती. या प्रकारानंतर त्यांनी माहीम पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी सुरेश पांडेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना गौरव मेहेर यांनी त्याला जीएसटीची रक्कम कॅश स्वरुपात देतो असे सांगून लोअर परेल येथील रजवाडी हॉटेलजवळ बोलाविले होते. तिथे ते त्यांचा मित्र अनिल मिश्रा यांच्यासोबत त्याची वाट पाहत होते. सकाळी साडेअकरा वाजता तिथे सुरेश पांडे ऊर्फ आतिश खेडकर हा आला होता. यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्यांनी त्याला माहीम पोलिसांच्या स्वाधीन केले. तपासात अतिश हा सध्या काहीच कामधंदा करत नाही. त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने गौरव मेहेर यांना कॉल करुन त्यांच्या मैत्रिणीच्या मृत्यूनंतर लायन्स क्लबमार्फत दोन लाखांची आर्थिक मदत करण्याची बतावणी करुन गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
तो पूर्वी सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये कामाला होता. त्याने अशाच प्रकारे सात ते आठजणांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्याला दोन वर्षापूर्वी कामावर काढून टाकण्यात आले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर आतिश खेडकर याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.