हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना सहा महिन्यांनी अटक

प्रॉपटीच्या वादातून वयोवृद्धाची हत्या करुन पळून गेले होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 मार्च 2026
मुंबई, – प्रॉपटीच्या वादातून रामलखन यादव या वयोवृद्धाची हत्या करुन पळून गेलेल्या दोन वॉण्टेड आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. चंद्रभूषण राजदेव चौहाण आणि विजयकुमार सुखारी चौहाण अशी या दोघांची नावे आहेत. हत्येच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते, अखेर सहा महिन्यानंतर या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात रामलखन यादव हे त्यांच्या कुटुंबियंसोबत राहतात. याच परिसरात चौहाण कुटुंबियदेखील राहतात. गेल्या काही दिवसांपासून यादव आणि चौहाण कुटुंबियांमध्ये प्रॉपटवरुन वाद सुरु होता. रामलखन यादव राहत असलेली खोली आपल्या मालकीचा असल्याचा दावा करुन चौहाण कुटुंबियांकडून त्यांच्यासोबत वाद सुरु होता. शुक्रवारी 5 सप्टेंबरला याच कारणावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये प्रचंड वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन चौहाण कुटुंबियांनी रामलखन यादव यांच्या घरात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी रामलखन यांना हाताने काठीने, बांबूने बेदम मारहाण केली होती.

त्यात रामलखन हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे प्राथमिक औषधोपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. शनिवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. रामलखन यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संतप्त झालेल्या यादव कुटुंबियांनी कांदिवली पोलिसांना दोषीवर कारवाई करण्यासाठी जोरदार घोषणाजाी केली होती. जोपर्यंत कारवाई होत नाही तोवर रामलखन यादव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कांदिवली पोलिसांना दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांविरुद्ध हत्येसह दंगल घडविणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या संजय चौहाण, अवधेश चौहाण आणि कमलेश चौहाण या तिघांना अटक केली.

त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नाव समोर आले होते. त्यात चंद्रभूषण आणि विजयकुमार यांचा समावेश होता. मात्र गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दोन दिवसांपूर्वी चंद्रभूषण चौहाण आणि विजयकुमार चौहाण या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page