धार्मिक कार्यक्रमासह विविध शो, सीएम शपथविधीत मोबाईल चोरीची कबुली
मोबाईल चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश सहाजणांना 52 मोबाईलसह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 मार्च 2026
मुंबई, – धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा तसेच इतर ठिकाणी होणार्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणार्या एका आंतरराज्य टोळीचा जे. जे मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी 52 हून अधिक चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. अटक आरोपींमध्ये साकिब अशफाक खान, सरताज सर्फराज शेख, आमीर आबिद खान, इस्तियाक सादिक खान, गोहर गुलाम जिलानी आणि अफजल उस्माईन नाई यांचा समावेश असून ते सर्वजण उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. त्यांच्या अटकेने मोबाईल चोरीच्या सोळा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीचे मोबाईल ही टोळी नेपाळसह बांगलादेशात विक्री करत होते. या टोळीने धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, विविध शो तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीत मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. या वृत्ताला पोलिसांनी अधिकृत दुजोरा देताना त्यांच्या अटकेने आणखीन मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अब्दुल रेहमान अस्लम सय्यद हा तरुण जे. जे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. 26 फेब्रुवारीला रमजान महिना सुरु असल्याने तो नेहमीप्रमाणे इफ्तारीचे सामान घेण्यासाठी बोहरी मोहल्ला, भेंडीबाजार परिसरात आला होता. यावेळी तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्याा मोबाईल चोरी केला होता. हा प्रकार नंतर त्याच्या लक्षात येताच त्याने जे. जे मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. गेल्या काही महिन्यांत परिसरात मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले होते. या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख, पोलीस निरीक्षक मुकूंदा वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस हवालदार नियाजुद्दीन तडवी, सचिन पाटील, पोलीस शिपाई मंदार घाडगे, प्रविण शेवरे, दिपक डावरे, भरत चौधरी, गणेश दळवी यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी संबंधित पोलीस पथक बोहरी मोहल्ला, नळबाजार, मस्ताव तलाव परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून संशयित व्यक्तींचा शोध घेत होते.
ही शोधमोहीम सुरु असताना एका संशयिताला पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर व अन्य पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. मोबाईल चोरी करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीत त्याच्या इतर काही सहकार्याचा सहभाग होता. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी इतर पाचही आरोपींना अटक केली. त्यांचा एक सहकारी पकडला गेल्याची माहिती मिळताच इतर पाच आरोपी उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे या पथकाने कुर्ला रेल्वे स्थानकासह इतर ठिकाणाहून विशेष मोहीम हाती घेऊन आरोपींना अटक केली.
सहाही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होते. यातील साकिब, आमीर आणि गोहर शिलाईकाम, इस्तियाक बिगारीकाम, अफजल केश कर्तन, सरताज हा रिक्षाचालक म्हणून काम करतो. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे 52 हून अधिक मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलची किंमत सुमारे पंधरा लाख रुपये इतकी आहे. त्यांच्या चौकशीतून मोबाईल चोरीच्या सोळा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर सहाही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रमांत अनेक मोबाईल चोरी
ही टोळी राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, विविध नामांकित शो कार्यक्रम तसेच इतर ठिकाणी होणार्या गर्दीचा फायदा घेऊन हातचलाखीने मोबाईल चोरी करत होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीच्या कार्यक्रमांतही या टोळीने काही लोकांचे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. ताडदेव आणि शिवडी येथे झालेल्या कार्यक्रमांत त्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी केले होते. या कार्यक्रमांत त्यांनी पन्नास ते सत्तरहून अधिक मोबाईल चोरी केल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर यांनी सांगितले.
कुठल्या राजकीय पक्षाची कुठे आणि केव्हा सभा होणार आहे, त्याची माहिती काढून ते सर्वजण सभेत सामिल होऊन मोबाईल चोरी करत होते. धार्मिक कार्यक्रमासह गर्दीच्या ठिकाणी ही टोळी लोकांना टार्गेट करत होती. भारतात चोरीचे मोबाईल ट्रेस होण्याची शक्यता असल्याने ही टोळी चोरीचे मोबाईल ते त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने नेपाळ आणि बांगलादेशात पाठवत होते. तिथेच चोरीच्या मोबाईलची स्वस्तात विक्री केली जात होती. आतापर्यंतच्या चौकशीत त्यांनी दिडशे ते दोनशेहून अधिक मोबाईल चोरीची कबुली दिली आहे..
गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी मुंबईसह उत्तरप्रदेशात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत सक्रिय होती. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह उत्तरप्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. पहिल्यांदाच या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या अटकेने मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोपींनी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरी केल्याने त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असेही तपास अधिकारी प्रशांत नेरकर यांनी सांगितले.