हत्येनंतर उत्तरप्रदेशात पळून गेलेल्या वॉण्टेड आरोपीस अटक

योजनाबद्ध कट रचून सहकार्‍याच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 मार्च 2026
मुंबई, – जानेवारी महिन्यांत व्यावसायिक वादातून भांडुप परिसरात शंकर ब्रम्हदेव प्रसाद ऊर्फ कल्की या 35 वर्षांच्या व्यक्तीची तिक्ष्ण हत्याराने वा करुन हत्या करुन उत्तरप्रदेशात पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट सातच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अख्तरअली अन्वरअली कुरेशी ऊर्फ छोटू असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. हत्येच्या गुन्ह्यांत अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टाने गुरुवार 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून हत्येनंतर छोटू हा पळून होता. त्याच्यावर योजनाबद्ध कट रचून शंकर प्रसाद याची हत्या घडवून आणल्याचा आरोप असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सांगितले.

ही घटना 25 जानेवारीला सायंकाळी सव्वासात वाजता भांडुपच्या तुळशेतपाडा रोड, माऊंड मेरी स्कूलसमोर घडली. शंकर प्रसाद हा याच परिसरातील जाहीद खान चाळीत त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. याच परिसरात अली कुरेशी ऊर्फ लाला, अख्तर ऊर्फ छोटू, अन्वर ऊर्फ फोटू आणि तौफिक कुरेशी ऊर्फ टाका असे चार भाऊ राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सज्जू मलिक यांच्याकडे शंकर हा कामाला होता. त्यामुळे त्यांच्यात चांगले संबंध होते. तसेच कुरेशी बंधूंही सज्जू मलिक यांच्यासाठी काम करत होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांनी शंकरला काम देण्यास सुरुवात केली होती. त्यावरुन शंकर आणि कुरेशी बंधूंमध्ये वाद सुरु होता. एप्रिल 2025 फटाके फोडण्यावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला आणि रागाच्या भरात कुरेशी बंधूंनी शंकरला मारहाण केली होती. मात्र सज्जू मलिकच्या मध्यस्थीमुळे प्रकरण वाढले नाही किंवा कोणीही पोलिसांत तक्रार केली नव्हती. तेव्हापासून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. जानेवारी महिन्यांत शंकर प्रसाद परिसरातील सोना प्रिमियम क्रिकेट लिगचे सामने पाहण्यासाठी गेले होते.

सायंकाळी सव्वासात वाजता सामने पाहून ते घरी जात होते. यावेळी माऊंट मेरी स्कूलसमोरच कुरेशी बंधूंनी त्यांच्या इतर तीन सहकार्‍यांच्या मदतीने शंकर प्रसादवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करुन त्याची हत्या केली होती. या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन हत्येनंतर पळून गेलेल्या सहाजणांना अटक केली. त्यात अरमान मलिक ऊर्फ अरु, जावेद ऊर्फ जब्या, प्रमोद ऊर्फ पम्या, अली कुरेशी ऊर्फ लाला, अन्वर ऊर्फ फोटू, तौफिक कुरेशी यांचा समावेश होता.

मात्र हत्येनंतर अख्तर ऊर्फ छोटू हा मुंबईतून पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना छोटू हा उत्तरप्रदेशला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर युनिट सातच्या एका विशेष पथकाने उत्तरप्रदेशातून हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या अख्तर कुरेशी ऊर्फ छोटूला अटक केली.

अटकेनंतर त्याला शनिवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास भांडुप पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page