एटीएमद्वारे पैसे काढून फसवणुक करणार्या टोळीचा पर्दाफाश
बिहार-झारखंड राज्यातून तिघांना तांत्रिक माहितीवरुन अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2026
मुंबई, – एटीएमद्वारे पैसे काढून एका व्यक्तीची फसवणुक करणार्या एका टोळीचा शिवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली. अनंतकुमार नागेश्वर महातो, अजीतकुमार प्रमोदकुमार सिंग आणि गोपालकुमार दिनेशकुमार सिंग अशी या तिघांची नावे असून ते तिघेही बिहार आणि झारखंडचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आलम लियाकतअली खान हे शिवडी परिसरात राहतात. 24 डिसेंबर 2025 रोजी ते शिवडीतील त्यांच्या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये आले होते. पैसे काढत असताना त्यांचा एटीएम कार्ड मशिनच्या स्लॉटमध्ये अडकले, त्यामुळे त्यांनी बँकेच्या हेल्पलाईन मोबाईलवर संपर्क साधून ही माहिती दिली. या माहितीनंतर समोरील व्यक्तीने त्यांना एक कर्मचारी भायखळा येथील मसिना हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये आहे. तिथे जाऊन तची मदत घेण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर त्यांनी बँक कर्मचार्याची वाट पाहिली, मात्र तिथे कोणीही आले नाही. त्यामुळे त्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर पुन्हा कॉल केला होता. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना कोणीही कर्मचारी सध्या उपलब्ध नसल्यासचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांचे एटीएम कार्ड ब्लॉक करुन दुसरे नवीन एटीएम कार्ड घेतले होते.
याच दरम्यान त्यांच्या डेबीट कार्डवरुन आठ वेगवेगळे व्यवहार झाल्याचे तसेच या व्यवहारातून 89 हजार 797 रुपये डेबीट झाल्याचे त्यांना बँकेतून मॅसेज प्राप्त झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार शिवडी पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात या गुन्ह्यांत चार आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. आरोपीने त्यांच्या बँकेच्या एटीएम कार्डवरुन रोख रक्कम काढल्याचे तसेच भायखळा येथील दुकानात ट्रॅव्हेल्स बॅग, शूज, ड्रायफ्रुट्स आदी साहित्य खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. तेथील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना संबंधित आरोपी बिहार आणि झारखंडचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे शिवडी पोलिसांचे दोन टिम बिहार आणि झारखंडला पाठविण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वनाथ कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, पोलीस निरीक्षक अनिल देवळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळेकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल शिंदे, पोलीस हवालदार कदम, साळेकर, वाडिले, पोलीस शिपाई शेख, जमादार, शेख, घाडगे यांनी अनंतकुमार आणि अजीतकुमार या दोघांना बिहारच्या गयातर गोपाळकुमारला झारखंडच्या सराईकेला येथून ताब्यात घेतले.
चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. तपासात अनंतकुमार आणि अजीतकुमार हे दोघेही बिहारच्या गया, फतेहपूर तर रिक्षाचालक असलेला गोपालकुमार हा झारखंडच्या सराईकिला, आदित्यपूरचा रहिवाशी आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या अन्य सहकार्याचा सहभाग उघडकीस आला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.