मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2026
मुंबई, – सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधान केल्याप्रकरणी अजामिनपात्र वॉरंट बजाविलेल्या एका वॉण्टेड आरोपीस डी. बी मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. काशिनाथ गुंडहर मंडल असे या 29 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा झारखंडचा रहिवाशी आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता, अखेर त्याला काळाचौकी परिसरातून गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
काशिनाथ मंडळ हा मूळचा झारखंडच्या डुमका, धारीहाथच्या नारायणपुराचा रहिवाशी आहे. 2018 साली त्याच्याविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांनी 501 (1), 502 (2), 182 भारतीय दंड सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. मात्र जामिनावर बाहेर येताच काशिनाथ हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध लोकल कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी करताना डी. बी मार्ग पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन दळवी यांनी काशिनाथच्या अटकेसाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
या पथकाने काशिनाथच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तो मूळचा झारखंडचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम झारखंडला गेली होती. मात्र पोलिसांची माहिती मिळताच तो पळून गेला होता. तो सतत त्याचे अस्तित्व बदलून राहत होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना मुश्किल झाले होते. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन काशिनाथ हा झारखंड येथून मुंबईत आला असून तो काळाचौकी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन दळवी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गौरव तवर, पोलीस हवालदार गणेश खोत, आनंद गावडे, पोलीस शिपाई विकास गिते अणि अतुल बुगड या पथकाने काळाचौकीतील अभ्युदयनगर, जिजामाता नगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून काशिना मंडलला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा संबंधित गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. अटकेच्या भीतीने तो गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता.
आठ वर्षांनंतर त्याला पोलीस आपल्याला पकडणार नाही असे वाटत होते. त्यामुळे तो झारखंड येथून मुंबईत नोकरीसाठी आला होता. मात्र त्याच्या वास्तव्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक तवर व अन्य पोलीस पथकाने त्याला शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करणार्या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे.