करनी करते म्हणून 52 वर्षांच्या महिलेची पतीकडून हत्या

अंत्यविधीसाठी आला व आईची हत्या झाल्याचे दिसून आले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मार्च 2026
मुंबई, – करनी करते, मुलांचा ऐकते या कारणावरुन सुरु असलेल्या वादातून एका 52 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून तसेच पाणी पिण्याच्या तांब्याच्या बाटलीने डोक्यात व चेहर्‍यावर वार करुन हत्या केली. सुरजबेन अमृत सोलंकी असे या 52 वर्षांच्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा आरोपी पती अमृत मेघा सोलंकी (58) याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवार 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मुलुंडहून धारावी येथे आलेल्या मुलाला घरी आल्यानंतर त्याच्याच वडिलांनी त्याच्या आईची हत्या केल्याचे दिसून आल्याने धारावी परिसरात एकच खळबळ उडाली होती.

ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास धारावीतील धारावी-कोळीवाडा, गुरुदत्त जिमजवळील जॅम्बो पास्कल चाळीत घडली. शिवराम अमृत सोलंकी हे मुलुंडच्या साईबाबा मंदिर, भैयावाडी चाळीत राहत असून भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. सुरजबेन आणि अमृत सोलंकी हे त्याचे आई-वडिल आहेत तर त्यांना रवी, करण आणि किशन नावाचे तीन भाऊ आहेत. त्याचे आई-वडिल धारावीतील जॅम्बो पास्कल चाळीत तर तिन्ही भाऊ ठाण्यातील चेकनाका, परवतनगर परिसरात राहतात. त्यांच्या वडिलांचाही भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या तीन महिन्यांत त्यांच्या आई-वडिलांमध्ये क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद होत होते. याबाबत चारही भावांना समजताच त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरीही ते सुरजबेनशी सतत वाद घालून भांडण करत होते. तसेच या भांडणात कोणीही मध्यस्थी करु नये, त्यांच्या घरी येऊ नये अशी सक्त ताकिद अमृतने चारही मुलांना दिली होती.

11 मार्चला रात्री नऊ वाजता शिवराम हे त्यांच्या धारावीतील घरी आले होते, यावेळी त्यांच्या आई-वडिलांमध्ये पुन्हा वाद झाल्याची माहिती त्याला समजली होती. त्यामुळे त्याने पुन्हा अमृत यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्यांना आईला जिवे मारण्याची धम्की दिली होती. शुक्रवारी त्यांच्या नात्यातील वसरमभाई सोलंकी यांच्या पत्नी मंजू सोलंकी हिचे आजारपणामुळे निधन झाले होते. तिचा अंत्यविधी धारावी स्मशानभूमीत होणार होता. त्यामुळे ते अंत्यविधीसाठी मुलुंड येथील घरातून निघाले होते. अंत्यविधीला वडिल अमृत यांच्यासोबत जावे यासाठी शिवराम हे त्यांच्या घरी गेले होते. दुपारी पावणेतीन वाजता ते त्यांच्या घरी आले. त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी अमृत यांना मोबाईलवर कॉल केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वडिल आतमध्ये असल्याचे समजताच त्यांनी त्यांना पुन्हा कॉल केला. यावेळी त्यांनी त्यांना व्हिडीओ कॉल केला. यावेळी त्यांच्या डोक्याला, कपड्यावर रक्त होते. त्याने त्यांना तुझ्यासोबत कोण आहे, सर्वांना बोलाव, तुझ्या आईची मी हत्या केली आहे असे सांगितले. त्यानंतर त्याने व्हिडीओ कॉलवरुन घडलेला प्रकार दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवरामला त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची तसेच सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. हा प्रकार स्थािनिवक रहिवाशांना समजताच त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी अमृत हा सुरजबेनच्या शेजारीच बसला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती समजताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

रक्तबंबाळ झालेल्या सुरजबेनला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर अमृत सोलंकीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत सुरजबेन आणि अमृत यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होते. सुरजबेन ही करनी करते, ती तिच्या मुलांचे ऐकते, त्याचे ऐकत नाही. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होते. त्यातून झालेल्या वादातून अमृतने तिची हातासह ओढणी गळा आवळून, पिण्याच्या तांब्याच्या बाटलीने डोक्यात चेहर्‍यावर बेदम मारहाण करुन हत्या केली होती. तपासात उघडकीस आलेल्या या प्रकारानंतर धारावी पोलिसांनी अमृत सोलंकीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या मुलाला त्याच्याच वडिलांनी त्याच्या आईची हत्या केल्याचे दिसून आल्याने सोलंकी कुटुंबियांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page