कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच ड्रग्ज गोळ्याची डिलीव्हरी

दहा गोळ्यासाठी दिड हजाराचे ऑनलाईन पेमेंट केले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव येथील लाईव्ह कॉन्सेट सुरु होण्यापूर्वी ड्रग्ज गोळ्याची डिलीव्हरी झाली होती, त्यासाठी रौनक खंडेलवालने आनंद पटेल याला ऑनलाईन दिड हजार रुपयांचे पेमेेंट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्या गोळ्या रौनकच्या सांगण्यावरुन प्रतिक पांडेने आणले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या संपूर्ण ड्रग्ज साखळीची पोलिसांकडून तपास केला आहे. दरम्यान आरोपीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले असून इतर बाराजणांच्या जबानीतून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची दिशा ठरविली आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोषी आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे आदेश वनराई पोलिसांना दिले आहेत.

शनिवारी नेस्को सेंटरमध्ये एका लाईव्ह कन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉर्न्स्टमध्ये तीन हजाराहून तरुण-तरुणी सामिल झाले होते. कार्यक्रमांत दोन तरुणीसह एका तरुणाला मद्यासह ड्रग्जचे सेवन केल्याने त्रास होऊ लागले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मालाडच्या लाईफलाईन आणि जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान बिस्मतसिंह अमरजीत सिंह आणि श्रेया राय या दोघांचा मृत्यू झाला होता तर शीतल साळवी हिच्यावर उपचार सुरु आहे. तिची प्रकृती आता स्थिर असून तिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्यासह आतापर्यंत बाराजणांची पोलिसांनी जबानी नोेंदवून घेतली होती. या जबानीतून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.

दरम्यान याप्रकरणी वनराई पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. त्यात रौनक राहुल खंडेलवाल, आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप, प्रतिक बिजेश पांडे आणि आनंद लक्ष्मण पटेल यांचा समावेश असून ते सर्वजण सध्या 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या सर्वांची पोलिसांनी टप्याटप्याने चौकशी केली जात असून या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशीत रौनक हा ड्रग्ज सप्लायर आनंद पटेल याच्या संपर्कात होता. त्याने त्याला एमडीच्या दहा गोळ्याची ऑर्डर दिली होती.

कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी आनंदने ड्रग्ज गोळ्याची डिलीव्हरी केली होती. त्या गोळ्या घेण्यासाठी रौनकने प्रतिकला पाठविले होते. त्यासाठी त्याने आनंदला ऑनलाईन दिड हजाराचे पेमेंट केल्याचे बोलले जाते. दुसरीकडे बिस्मतसिंह आणि श्रेया यांचे मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले आहे. त्यांचा व्हिसेरा यापूर्वीच कालिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

हा अहवाल लवकर मिळावा यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. कॉर्न्स्टमध्ये ड्रग्जचा पुरवठा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता पोलिसांनी या ड्रग्ज साखळीचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत दोन ते तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page