लोकल प्रवासादरम्यान 43 लाखांच्या कॅश चोरीप्रकरणी आरोपीस अटक

30 लाखांची कॅश हस्तगत तर इतर तिघांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2026
मुंबई, – सीएसएमटी-दादर लोकल प्रवाशादरम्यान लोकलमध्ये गोंधळ घालून लक्ष विचलित करुन सुमारे 43 लाखांची कॅश असलेली बॅग चोरी करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोहम्मद बकील ईदुल्लक शेख असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची सुमारे तीस लाखांची कॅश हस्तगत केली आहे. या गुन्ह्यांत सचिन, उस्मान आणि राकेश शर्माया तिघांचा सहभाग उघडकीस आला असून ते तिघेही पळून गेले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पळून गेलेल्या तिघांवर लवकरच अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी सांगितले.

सोहन जोर सिंग हे डोंबिवलीतील नाकेाडा इंडस्ट्रिजचे मालक यश विनय मेहता यांच्याकडे ते कामाला आहेत. दिवसभर काम करुन ते कंपनीच्या इतर कर्मचार्‍यासाठी असलेल्या स्टाफ रुममध्ये राहतात. त्यांच्यावर वेगवेगळ्या दुकानात जाऊन मालकाने विक्री केलेल्या भंगार सामानाच्या विक्रीचे पैसे कलेक्शन करण्याची जबाबदारी होती. 4 एप्रिलला ते त्यांचे सहकारी भैरुसिंग प्रेमसिंग यांच्यासोबत काळबादेवी येथे कलेक्शन कामासाठी गेले होते. वेगवेगळ्या दुकानातून त्यांनी 43 लाख 24 हजार 700 रुपयांची कॅश जमा करुन एका बॅगेत ठेवली होती. त्यानंतर ते दोघेही छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथे आले होते. तेथून त्यांनी कल्याण फास्ट लोकल पकडली होती. यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती.

रात्री आठ वाजता ही लोकल दादर रेल्वे स्थानकात आली होती. यावेळी लोकलमध्ये तीन तरुणांनी अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. या भांडणामुळे त्यांचे लक्ष विचलित झाले होते. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांची कॅश असलेली बॅग चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच सोहन सिंग यांनी दादर रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने 43 लाखांची कॅश चोरी केली होती, त्याची पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त स्मिता साळुंखे-ठाकरे, प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांनी गंभीर दखल घेत दादर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत सुळे, पोलीस हवालदार मिलिंद भोजणे जयेश बोरात, सोमनाथ गायकवाड, सतीश धायगुडे, सुनिल मागाळे, कुणाल वाल्दे यांनी गोवंडी येथून मोहम्मद बकील याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत तो गोवंडीतील गौतमनगर परिसरात राहत असून त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. याकामी त्याला सचिन, उस्मान आणि राकेश शर्मा या तिघांनी मदत केली होती. त्याच्या घरातून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या सहा हजार नोटा अशा तीस लाखांची कॅश जप्त केली आहे. तपासात मोहम्मद बकील हा त्याच्या सहकार्‍यासोबत लोकलने प्रवास करताना प्रवाशांचे लक्ष विचलित करुन त्यांचे बॅग चोरी करत होते. अशा प्रकारे चोरी ही करणारी ही टोळी असल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत त्याच्या तीन सहकार्‍यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page