घरात प्रवेश करुन विवाहीत मुलीसह पतीकडून दिड लाखांची चोरी

विविध दागिने व लॅपटॉप घेऊन दोघांचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2026
मुंबई, – हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची बतावणी करुन पालघर येथे बोलावून मुलीने तिच्या पतीच्या मदतीने वडिलांच्या घरात प्रवेश बेकायदेशीर प्रवेश करुन विविध सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची धक्कादायक घटना खार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आलिशा आणि दानिश या दोघांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून खार पोलिसांकडून तपास सुरु आहे. यातील आलिशा ही तक्रारदाराची मुलगी असून तिनेच वडिलांची दिशभूल करुन हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

फॅन्सिस पॉल परमार हे वांद्रे येथे राहत असून ते इस्टेट एजंट म्हणून काम करतात. त्यांना अलिशा नावाची एक मुलगी असून तिने घरातून पळून जाऊन दानिशसोबत लग्न केले होते. लग्नानंतर ती दानिशसोबत नालासोपारा येथे राहते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन त्यांची मुलगी पालघर येथील मार्केटमध्ये पडली असून तिला जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर या व्यक्तीने कॉल बंद केला होता. त्यांनी त्यांच्या मुलीला कॉल करण्याचा प्रयत्न केला असता तिचा मोबाईल बंद येत होता.

काही वेळानंतर तिचा कॉल लागला आणि ती रडत रडत हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे ते त्यांच्या पत्नी आणि मित्रांसोबत तातडीने पालघर येथे जाण्यासाठी निघाले. लोकलने विरार येथे आल्यानंतर त्यांच्या शेजारीच राहणार्‍या अशोक पटेल यांनी त्यांना कॉल केला होता. त्याने त्यांची मुलगी आलिशा त्यांच्या घरी आली असून ती घरातील लॉक तोडत आहे असे सांगितले. त्यामुळे ते विरार येथून पुन्हा त्यांच्या घरी येण्यासाठी निघाले होते. घरी आल्यानंतर त्यांना सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या वीस वर्षांचे जुने सर्व सोन्याचे दागिने आणि डेल कंपनीचा लॅपटॉप असा सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल घेऊन आलिशा ही पळून गेली होती.

चौकशीनंतर त्यांना तिच्यासोबत तिचा पती दानिश हादेखील असल्याचे समजले. या प्रकारानंतर त्यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्या मुलीसह तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आलिशा आणि दानिश यांच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपीवर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page