ड्रग्जची टिप दिली म्हणून ओला चालकावर ब्लेडने हल्ला

दोन बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल तर एका बंधूला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2026
मुंबई, – एमडी ड्रग्जची टिप नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांना दिल्याचा आरोप करुन दोन बंधूंनी सर्फराज शाहजहान अन्सारी या 32 वर्षांच्या ओला चालकाला लाथ्याबुक्यासह ब्लेडने वार करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अबरार साबीर पठाण ऊर्फ अबरार खान आणि नाजीर साबीर पठाण ऊर्फ नाजीर खान या दोन्ही बंधूंविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच नाजीर पठाणला पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अबरार हा पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याच्याविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न, मारामारी, धमकीसह ड्रग्ज तस्करीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्फराज हा जोगेश्वरी येथे राहत असून ओला कंपनीत चालक म्हणून काम करतो. अबरार हा त्याच परिसरात राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्याच्याविरुद्ध हत्येसह मारामारी, धमकी देणे आदी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. त्याच्या वाढत्या कारवाईनंतर मेघवाडी पोलिसांनी अबरारविरुद्ध तडीपारची कारवाई केली होती. गेल्या काही वर्षांपासून तो एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत सक्रिय होता. याबाबत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. 2021 साली त्याच्या घरी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला होता. या कारवाईत या अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जसहीत काही कॅश जप्त केली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती.

याच गुन्ह्यांत तो कारागृहात होता. अलीकडेच त्याची जामिनावर सुटका झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता सर्फराज अन्सारी हा त्याच्या मित्रांसोबत जोगेश्वरीतील स्वामी स्कूलजवळील बिग बॉस सलुनजवळ गप्पा मारत होते. याच दरम्यान तिथे अबरार आला होता. सिगारेट पित असताना तो सर्फराजकडे रागाने पाहत होता. काही वेळानंतर तिथे त्याचा भाऊ नाजीर आला. त्यानंतर ते दोघेही त्याच्याकडे आले. त्यानेच एमडी ड्रग्जची टिप एनसीबी अधिकार्‍यांना दिली होती असा आरोप करुन त्यांनी त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. आज तुझा गेमच करतो असे सांगून या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली.

ब्लेडसह वस्तर्‍याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. यावेळी तिथे काही लोक जमा झाले होते. त्या सर्वांना धमकी देऊन ते दोघेही पळून गेले होते. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला, गळ्यावर, गालावर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे सर्फराजला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. ही माहिती प्राप्त होताच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सर्फराज अन्सारी याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अबरार पठाण आणि नाजीर पठाण या दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या नाजीरला पोलिसांनी काही तासांत अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अबरारला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ड्रग्जची एनसीबी अधिकार्‍यांना टिप दिल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page