मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2026
मुंबई, – कांदिवली परिसरात राहणार्या एका वयोवृद्ध महिलेच्या बंद रुममध्ये प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने सुमारे दहा लाखांची कॅश आणि आठ तोळ्याचे विविध सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हलीमा गुलामनबी शेख ही वयोवृद्ध महिला कांदिवलीतील पोयसर, दादामियाँ चाळीतील रुम क्रमांक 67 मध्ये राहते. ती कटलरी सामानासह ब्लॅकेट आणि कपडे विक्रीचे काम करते. तिच्या बहिणीच्या मुलीचे लग्न झाले होते, त्यावेळेस तिने तिला सहा लाख रुपये दिले होते. तसेच तिने तिच्या वैयक्तिक बचतीचे चार लाख असे दहा लाख रुपये तिने तिच्या परिचित संध्या निर्मल हिच्याकडे दिली होती. पंधरा दिवसांपूर्वी तिने दहा लाख रुपये तिच्याकडून घेऊन स्वतच्या घरी ठेवली होती. याच कपाटात तिचे आठ तोळे दागिने होते. रविवारी सकाळी साडेदहा वाजता ती सध्या निर्मलसोबत बोरिवली येथे गेली होती.
रात्री पावणेनऊ वाजता ती तिच्या घरी आली होती. यावेळी तिला तिचे दोन्ही रुमचे दरवाजे उघडे दिसले. आतमध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर तिला तिच्या घरातील सर्व अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यामुळे तिने कपाटातील कॅशसह सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात तिला दहा लाखांची कॅश आणि सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर राहत्या घरी औषधोपचार करण्यता आले होते.
प्रकृती ठिक झाल्याननंतर तिने मंगळवारी घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींचा शोध सुरु आहे.