मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने सोळाजणांची फसवणुक

बोगस नियुक्तीपत्र देऊन गंडा घालणार्‍या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 एप्रिल 2026
मुंबई, – महानगरपालिकेत विविध पदावर नोकरीचे आमिष दाखवून सोळा बेरोजगार तरुणांची एक ठग महिलेने सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार परळ परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमिता जगदीश राठोड या महिलेविरुद्ध पोलिसांनी बोगस नियुक्तीपत्र देऊन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुनिता उद्धव इंगळे ही महिला चेंबूर येथे राहत असून ती तिच्या पतीसोबत प्लंबर म्हणून काम करते. नोव्हेंबर 2023 रोजी ती तिच्या पतीसोबत महानगरपालिकेच्या एफ/साऊथ विभागात कामानिमित्त गेले होते. तिथे एक महिला 50 मुलीसोबत मेडीकलसाठी आली होती. या महिलेची चौकशी केल्यांनतर तिचे नाव अमिता राठोड असल्याचे समजले. ती कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. तिची मनपामधील अनेक बड्या अधिकार्‍यांशी चांगले संबंध आहेत. ती बेरोजगार तरुण-तरुणींना महानगरपालिकेत विविध पदावर नोकरी देते, त्यासाठी ती 50 तरुणींना मेडीकलसाठी घेऊन आल्याचे समजले होते. त्यामुळे तिने तिच्या मुलाला मनपामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी तिने तिच्या मुलाला नोकरीचे आश्वासन देताना तिच्याकडे सत्तर हजाराची मागणी केली होती. तिनेही त्यास होकार दर्शविला होता.

यावेळी तिने तिच्या परिचित अनेक तरुण-तरुणी असून त्यांनाही मनपामध्ये नोकरी देण्याची विनंती केली होती. तिनेही सर्वांचे काम करण्याचे आश्वासन दिले होते. तिच्यावर विश्वास ठेवून तिने तिच्या मुलासह तिच्या परिचित आनंद गणेश गजभिये, ममता गणेश गजभिये, विजय मुकूंदा निकम, देवानंद अर्जुन सोनावणे, आशा नाना पगारे, कोमल सागर इंगळे, श्रीराम आजीनाथ भानुसे, अंकिता रोहन तांबे, किरण सुखदेव सोनावणे, सुमीत शिवाजी लोखंडे, कोमल अनिल सुरवाडे, शुभम प्रणव मोहिते, निखील मुकूंदा निकम आणि सुयेश टाकळकर यांच्याकडून प्रत्येकी सत्तर हजाराप्रमाणे नऊ लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते. तसेच विकास सुभास सोनावणे आणि सागर मोहन सुधार यांनी तिला प्रत्येकी दहा हजार रुपये दिले होते.

अशा प्रकारे तिने सोळा उमेदवारांना महागनरपालिकेत नोकरी देते असे सांगून 9 जानेवारी ते 27 जून 2024 या कालावधीत दहा लाख रुपये घेतले होते. त्यापैकी पाच लाख वीस हजार ऑनलाईन तर चार लाख ऐंशी हजार कॅश स्वरुपात देण्यात आले होते. मात्र बरेच दिवस उलटूनही तिने कोणालही नोकरी दिली नाही. त्यामुळे तिच्यासह इतर मुलांच्या कुटुंबियांनी तिच्याकडे विचारणा सुरु केली होती. याच दरम्यान तिने मनपाची नोकरीची जाहिरात दाखवत तीन तरुणांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिले होते. उर्वरित मुलांना टप्याटप्याने नोकरी मिळेल असे सांगितले. तिने दिलेले नियुक्तीपत्र घेऊन संबंधित कुटुंबिय महागरपालिकेत कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना अमिता राठोड हिने दिलेले नोकरीचे तिन्ही नियुक्तीपत्र बोगस असल्याचे समजले.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिच्याकडे नोकरीसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती, यावेळी तिने त्यांना दहा लाखांचे दोन धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. काही दिवसांनी ती कोणालाही पैसे न देता पळून गेली होती. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारासह संबंधित इतरांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अमिताविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन सोळा उमेदवारांची सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अमिताने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे तिच्याकडून फसवणुक झालेल्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page