पवईच्या एमएमआरडीए फ्लॅटसाठी घेतलेल्या 43 लाखांचा अपहार
बोगस दस्तावेजासह फसवणुकीप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – पवईच्या हिलग्रेंज अपार्टमेंटमध्ये एमएमआरडीएच्या टू बीएचकेचा स्वस्तात फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे 43 लाखांचा अपहार करुन एका इस्टेट एजंटने पिता-पूत्राची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महेंद्र बाबू पवार या आरोपीविरुद्ध पार्क साईट पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. महेंद्र पवारने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
विकी सुधीर तांदळे हे त्यांच्या वडिलांसोबत पवई येथे राहत असून सध्या ते एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. पूर्वी ते कांजूरमार्ग परिसरात राहत होते. 2020 साली त्यांना लग्न करायचे होते, त्यासाठी त्यांना एक फ्लॅट घ्यायचा होता. मात्र आईच्या निधनानंतर त्यांचा फ्लॅट घेण्याचा निर्णय रद्द झाला होता. त्यांनी आईची टर्म पॉलिसी काढली होती. तिच्या निधनानंतर त्यांना पन्नास लाख रुपये मिळाले होते. याच दरम्यान त्यांच्या परिचित मिलिंद वाघमारे यांनी त्यांची महेंद्र पवारशी ओळख करुन दिली होती. महेंद्र हा घाटकोपर येथे राहत होता. त्याने त्यांना पवईतील हिरानंदानीमध्ये एमएमआरडीएचा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या वडिलांनी फ्लॅटबाबत महेंद्रशी सविस्तर चर्चा केली होती.
या चर्चेत त्याने त्यांना 90 लाखांमध्ये टू बीएचके फ्लॅट देणार असल्याचे सांगितले होते. पेमेंट करताना त्यांना फ्लॅटचे कागदपत्रे मिळतील आणि काही दिवसांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर त्याने त्यांना हिरानंदानीच्या हिलग्रेंज इमारतीमधील नवव्या मजल्यावरील एक फ्लॅट दाखविला होता. फ्लॅट आवडल्यानंतर त्यांच्यता एक एमओयू झाला होता. या करारानंतर त्यांनी त्याला टप्याटप्याने 43 लाख 15 हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर महेंद्रने त्यांना एमएमआरडीएचे काही दस्तावेजासह पैसे भरल्याची पावती दिली होती.
मात्र काही दिवस उलटूनही त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे ते त्यांच्या वडिलांसोबत एमएमआरडीए कार्यालयात गेले होते. महेंद्र दिलेले कागदत्रे दाखवून फ्लॅटबाबात विचारणा केली होती. मात्र तिथे उपस्थित अधिकार्याने त्यांनी सादर केलेले दस्तावेज आणि पावत्या बोगस असल्याचे सांगितले. या माहितीने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे ते महेंद्र पवारच्या घाटकोपर येथील कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याने पैशांसाठी काही दिवसांची मुदत मागितली, मात्र दिलेल्या मुदतीत पैसे न देता कार्यालयाला टाळे लावून पलायन केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच विकी तांदळे यांनी पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून महेंद्रविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एमएमआरडीएच्या फ्लॅटच्या नावाने त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.