मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2026
मुंबई, – विदेशातून हायड्रोपोनिक गांजा तस्करीचे सत्र सुरुच असून मंगळवारी रात्री उशिरा बँकाँकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणलेला 11 कोटी 69 लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना या अधिकार्यांनीअटक केली आहे. सीवानेसन माणिकराज, स्नेहा सेंथिलकुमार आणि आकाश भास्कर निवले अशी या तिघांची नावे असून ते तिघेही तामिळनाडू आणि सांगलीचे रहिवाशी आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिघांनाही किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्जविरोधात हवाई गुप्तचर विभागाने धडक मोहीम हाती घेतली होती. गेल्या काही वर्षांत विदेशात विशेषता बँकाँकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होत असल्याने सर्व तपास यंत्रणेला सतर्कचा इशारा देण्यात आला होता. ही मोहीम सुरु असताना मंगळवारी आकाश निवले हा बँकाँकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याकडे ड्रग्ज असल्याची माहिती प्राप्त होताच त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांनी 1640 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 1 कोटी 64 लाख रुपये इतकी आहे. आकाश हा महाराष्ट्रातील सांगलीचा रहिवाशी असून काही दिवसांपूर्वीच तो बँकाँक येथे गेल्याचे तपासात उघडकीस आले.
दुसर्या कारवाईत या अधिकार्यांनी 10 किलो 53 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. सीवानेसन आणि स्नेहा हे दोघेही तामिळनाडूचे रहिवाशी आहे. मंगळवारी रात्री उशिरा ते दोघेही हानोई येथून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेत 10 किलो 053 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा सापडला. त्याची किंमत 10 कोटी 5 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.
या दोन्ही कारवाईत हवाई गुप्तचर विभागाने एका महिलेसह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 11 कोटी 69 लाखांचा गांजाचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिघांनाही बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कदोठडी सुनावली आहे. ठराविक रक्कमेच्या कमिशनपोटी या तिघांनी हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.