स्मशानभूमीतील राखेतून सोने काढणार्या महिलेच्या घरी चोरी
नऊ लाखांच्या कॅशसहीत सोन्या-चांदीचे दागिने पळविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – स्मशानभूमीतील राखेतून सोने काढणार्या एका महिलेच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन सुमारे सव्वानऊ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. त्यात साडेचार लाखांच्या कॅशसहीत विविध सोन्या-चांदीच्या दागिने आणि वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
ही घटना 24 एप्रिल ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत मुलुंडच्या नवघर गल्ली क्रमांक एक, आनंदीबाई चाळीत घडली. याच चाळीतील साईनिधी निवासमध्ये छाया अंबादास माघाडे ही 50 वर्षांची तक्रारदार महिलागेल्या पंधरा वर्षांपासून एकटी राहते. ती स्मशानभूमीतील राखेतून सोने काढण्याचे काम करण्याचे काम करते. त्यातून मिळणार्या उत्पनातून तिचा उदरनिर्वाह चालतो. 24 एप्रिलला ती तिच्या नातेवाईकाच्या लग्न असल्याने जालना येथील रामनगर येथे गेली होती.
29 एप्रिलला रात्री साडेआठ वाजता ती जालनाहून मुंबईत तिच्या घरी आली होती. यावेळी तिला तिच्या घरातील कुलूप तुटलेले दिसले. तिने आत जाऊन पाहणी केली असता तिच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. कपाटातील कॅशसहीत दागिन्यांची पाहणीदरमन तिला तिच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले.
24 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत घरी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात प्रवेश केला होता. या व्यक्तीने तिच्या घरातील सव्वानऊ लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. त्यात साडेचार लाखांची कॅश आणि विविध सोन्या-चांदीचे दागिने वस्तू आदी मुद्देमालाचा समावेश होता. छायाकडून ही माहिती तिच्या शेजार्यांना समजली आणि त्यांनी नवघर पोलिसांना ही माहिती दिली.
या माहितीनंतर नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी छाया माघाडे हिची पोलिसांनी जबानी नोदवून घेतली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंद केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.