व्यवहाराच्या नोंदी डिलीट करुन सव्वादहा कोटीचा अपहार
पार्टनरसह भावाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – व्यवहाराच्या नोंदी डिलीट करुन सुमारे सव्वादहा कोटीचा अपहार करुन एका चांदीच्या व्यापार्याची त्याच्याच पार्टनरसह त्याच्या भावाने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही व्यापारी बंधूंविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. अविश योगेश जैन आणि आलिश योगेश जैन अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर 1 कोटी 17 लाख रुपयांचे 47 किलो चांदीचे ठोकळे, 4 किलो 75 लाख रुपयांचे 146 किलो चांदीचे दागिने आणि 4 कोटी 30 लाखांच्या कॅशचा अपहार केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.
अभिषेक भवरलाल शहा हे व्यापारी असून ते गिरगावच्या सी पी टॅक परिसरात राहतात. गेल्या 21 वर्षांपासून त्यांचा चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे झव्हेरी बाजार येथे नाईन सील ज्वेलर्स नावाची एक फर्म आहे. 2017 पासून त्यांच्याकडे अविश जैन हा अकाऊंट आणि सेल्सचे कामकाज पाहतो. 2020 पासून त्यांनी या कामाचे एका सॉफ्टवेअरद्वारे नोंद करणे सुरु केले होते. त्यात सर्व प्रकारच्या स्टॉक इंट्री, पेमेंट आणि सेलबाबतची नोंद केली जात होती. तीन वर्षांपूर्वी त्याने अभिषेक शहा यांच्या व्यवसायात सत्तर लाखांची गुंतवणुक केली होती. त्यासाठी त्यांनी त्याला तीस टक्के पार्टनरशीप दिली होती.
याच दरम्यान त्यांच्या सॉफ्वेअरमधील काही नोंदी अचानक डिलीट झाले होते, बरेच प्रयत्न करुनही त्यांना संबंधित नोंद मिळविता आली नाही. त्यामुळे त्यांना व्यवसायात एक कोटीचे नुकसान झाले होते, त्यांना मार्केटमध्ये सहा कोटी देणे लागत असल्याचे दिसून आले होते. चौकशीदरम्यान त्यांना सॉफ्टवेअरमधील चार नोंदी डिलीट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संबंधित नोंदीच्या बँक स्टेटमेंटची पाहणी केली होती. त्यात अविश व त्याचा भाऊ आलिस जैन यांनी त्यांच्या कपडयाच्या शॉपच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तसेच हरियाणा येथील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये काही व्यवहार केल्याचे दिसून आले.
हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी त्यांच्या फर्मच्या विश्वासू कर्मचार्यांच्या मदतीने सर्व लेखी नोंदी, विक्री आणि प्रॉफिटची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. त्यात त्यांना त्यांच्या दागिन्यांच्या मालापैकी 1 लाख 17 लाख 50 हजार रुपयांचे 47 किलो चांदीचे ठोकळे, 4 कोटी 75 लाख रुपयांचे 146 किलो चांदीचे विविध दागिने कमी असल्याचे दिसून आले. तसेच व्यवहारातील वेगवेगळ्या ग्राहकांनी कंपनीला दिलेल्या पेमेंटच्या 4 कोटी 30 लाख 81 हजार 990 रुपयांची कॅशमध्ये मोठ्या प्रमाणात अविश आणि अलिश यांनी फेरफार करुन ती रक्कम स्वतच्या कंपनीच्या बँक खात्यात वळविल्याचे दिसून आले.
अशा प्रकारे अविश आणि आलिश यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहाराचे नोंदी डिलीट करुन विविध चांदीचे दागिने, ठोकळे आणि कॅश अशा 10 कोटी 23 लाख 31 हजार 990 रुपयांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी या दोन्ही आरोपी बंधूंविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आविश जैन आणि आलिश जैन यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.