एका वर्षांत दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून इंजिनिअरची फसवणुक

1482 गुंतवणुकदारांना पावणेदोन कोटींना गंडा झाल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – एक वर्षांत गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट देतो असे सांगून एका सेवानिवृत्त इंजिनिअरची सुमारे दहा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंजिनिअरच्या तक्रारीवरुन कंपनीच्या मुख्य संचालकासह इतर पदाधिकार्‍याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. करण मेहरा, अनिथा मुरलीधर पनीकर, प्रांजल गिताबेन मेनन, विघ्नेश मुरलीदास पनीकर आणि मनिषदास मुरलीदास पनीकर अशी या पाचजणांची नावे आहेत. या कंपनीने मुंबईसह मुंबईबाहेरील 1842 गुंतवणुकदारांकडून सुमारे पावणेदोन कोटी रुपये घेऊन त्यांना कुठलाही परतावा दिला नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीचे संचालकासह पदाधिकारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

श्याम बाबूराव चिल्लरगे हे पवईतील चांदीवलीचे रहिवाशी असून वांद्रे येलि ओएनजीसी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्यांनी ती नोकरी सोडली असून सध्या ते घरी असतात. मार्च 2023 रोजी ते त्यांच्या सेव्हींगमधील काही रक्कम चांगल्या योजनेत गुंतवणुकीचा विचार करत होते. याच दरम्यान त्यांनी एका टिव्हीमधील शो पाहिला, त्यात त्यांना एका खाजगी गुंतवणुक कंपनीची माहिती मिळाली होती. सोशल मिडीया कंपनीची माहिती काढत असातना त्यांना एक मोबाईल क्रमांक सापडला. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्यांना कंपनीचे कार्यालय काळबादेवी येथील भुलेश्वर, डॉ. आत्माराम मर्चंट रोड, जयहिंद इस्टेटमध्ये असल्याचे समजले.

यावेळी एका कर्मचार्‍याने त्यांची कंपनी इलेक्ट्रीक टॅक्टर, सायकल, शेतीसंबंधित अवजारे, टू व्हिलर, सोलर वाहने तयार करत असून त्यातून कंपनीला चांगला फायदा होता, त्यामुळे कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना वर्षभरात गुंतवणुक रक्कम दुप्पट मिळेल असे सांगण्यात आले. या कर्मचार्‍याने त्यांचे बोलणे कंपनीचे संचालक करण मेहरा यांच्याशी करुन दिले होते. त्यांनीही त्यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना एका वर्षांत दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी कंपनीत टप्याटप्याने दहा लाखांची गुंतवणुक केली होती.

या गुंतवणुकीनंतर त्यांच्यासोबत कंपनीचा एक करार झाला होता. मात्र एक वर्ष उलटूनही कंपनीने त्यांना मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम दिली नाही. विविध कारण सांगून करण मेहरा व त्याचे इतर सहकारी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. चौकशीअंती त्यांना फेब्रुवारी 2023 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत या कंपनीत मुंबईतील 40 तर मुंबईबाहेरील 1442 गुंतवणुकदारांनी सुमारे पावणेदोन कोटीची गुंतवणुक केल्याची माहिती समजली. मात्र कंपनीने कोणालाही एका वर्षांत दुप्पट रक्कम दिली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची पोलिसांनी शहानिशा केली असता कंपनीने अनेक गुंतवणुकदारांना दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे उघडकीस आले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी करण मेहरा याच्यासह इतर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता, बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून कंपनीचया संचालकासह इतरांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page