मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका एका महिलेसह चौघांना उडविल्याची घटना उघडकीस आली आहे. अपघातानंतर आरोपी कारचालक घटनास्थळाहून पळून गेला, मात्र त्याला काही तासांत पवई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध पवई पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून चौघांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जखमींमध्ये मनिषा सावंत, नाथा सोपान पारगावकर, अम्माचार पांडे आणि धनुष पांडे यांचा समावेश असून यातील मनिषा सावंतला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पवईतील हिट अॅण्ड रनच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
हा अपघात रविवारी सायंकाळी पवईतील वेस्टर्न ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, जेव्हीएलआर मार्गावरील महात्मा फुले नगराजवळ घडली. आरोपी कारचालक तरुण नवी मुंबईतील खारघर परिसरातील रहिवाशी आहे. सायंकाळी तो त्याच्या क्रेटा कारमधून पवईच्या दिशेने जात होता. ही कार महात्मा फुले नगर परिसरात आली असता त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरुन जाणार्या तीन पादचार्यासह एका बाईकस्वाराला जोरात धडक दिली होती. या अपघातात एका महिलेसह चारजण जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता तो कारसहीत पळून गेला होता.
अपघाताची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यापैकी तिघांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले तर मनिषा सावंत हिला सायन हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. अपघातानंतर कारचालक विक्रोळीच्य दिशेने पळून जात असताना त्याला वाहतूक पोलिसांनी विक्रोळी पार्कसाईट परिसरातून ताब्यात घेतले.
चौकशीने त्याच्या कारने हा अपघात झाल्याचे उघडकीस आले, त्यामुळे त्याला पुढील कारवाईसाठी पवई पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झाला नाही. अपघाताच्या वेळेस त्याने मद्यप्राशन केले होते का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी झालेल्या या अपघाताच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.