पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाची हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन संतोषकुमार वकिल बिंद या 31 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शनिवारी मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या राकेशकुमार झुंकू धीवर या 42 वर्षांच्या आरोपीस अटक केली आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने गुरुवार 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राकेशकुमार त्याच्या पत्नीचे संतोषकुमारसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून त्याने संतोकुमारची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मुलुंडच्या जे. एन रोड, साईनाथ प्लाझासमोर घडली. विशाल वकिल बिंद हा मुलुंड येथे राहत असून मृत संतोषकुमार हा त्याचा मोठा भाऊ आहे. याच परिसरातील जे. एन रोड, इंदिरानगरात राकेशकुमार हा त्याच्या पत्नीसोबत राहत असून त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. ते एकमेकांच्या परिचित होते. राकेशकुमारला त्याच्या पत्नीचे संतोषकुमारसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयावरुन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु ाहेते. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता राकेशकुमारने संतोषकुमारशी वाद घालून त्याला शिवीगाळ केली होती.

काही कळण्यापूर्वीच त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याच्या तोंडाला, गळ्याला, छातीला, पोटाला, पाठीला आणि दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेला संतोषकुमार हा जागीच कोसळला होता. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या संतोषकुमारला पोलिसांनी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी विशाल बिंद याच्या जबानीवरुन घडलेला प्रकार पोलिसांना समजला. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राकेशकुमारविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या राकेशकुमारला मुलुंड येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच संतोषकुमारची चाकूने भोसकून हत्या केल्याची कबुली दिली. त्याचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता, याच कारणावरुन त्याने त्याचा कायमचा काटा काढल्याचे सांगितले.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर आरोपीला मुलुंडच्या लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक नितीन खडगे हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page