स्वस्तात फ्लॅटचे गाजर दाखवून डॉक्टरची 65 लाखांची फसवणुक
वॉण्टेड असलेल्या खाजगी ट्रस्टच्या पदाधिकार्याला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – मालाड येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील अल्टा माऊंट टॉवरमध्ये थ्री बीएचके फ्लॅट स्वस्तात देण्याचे गाजर दाखवून एका डॉक्टरची सुमारे 65 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी ट्रस्टच्या पदाधिकार्याला कुरार पोलिसांनी अटक केली. ब्रिजेश गिरजाशंकर यादव ऊर्फ पिंटू यादव असे या आरोपी पदाधिकार्याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचा दुसरा सहकारी संतोष यादव ऊर्फ साहिल घाने हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ते दोघेही महेंद्रा हायटेक एज्युकेशन अॅण्ड चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी असल्याचे सांगून ट्रस्टच्या माध्यमातून स्वस्तात फ्लॅटचे आमिष दाखवून गंडा घालत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
33 वर्षांचे तक्रारदार सुजीतकुमार श्यामबिहारी पटेल हे व्यवसायाने डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहतात. याच परिसरात त्यांचे एस क्लिनिक नावाचे एक हॉस्पिटल आहे. सप्टेंबर 2023 रोजी त्यांची ब्रिजेश आणि संतोष यांच्याशी ओळख झाली होती. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांची महेंद्रा हायटेक एज्युकेशन अॅण्ड चॅरीटेबल नावाची एक ट्रस्ट आहे. ही संस्था सेनिटरी पॅडचा विक्रीचा व्यवसाय करत असून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू लोकांना कमी किंमतीत फ्लॅट दिल्याचे सांगितले होते. त्यांनी त्यांनाही स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या क्लििनिकमध्ये नियमित येत होते, त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. नोव्हेंबर 2023 रोजी ते दोघेही त्यांच्या क्लिनिकमध्ये आले होते, यावेळी त्यांनी त्यांना मालाडच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अल्टा माऊंनमध्ये एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे.
त्यांच्या संस्थेमार्फत फ्लॅटची खरेदी केल्यास त्यांना कमी किंमतीत फ्लॅट तसेच कमी व्याजाने बँकेतून कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. थ्री बीएचके फ्लॅट स्वस्तात मिळत असल्याने त्यांनी त्यांच्यासोबत फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. याच दरम्यान ते दोघेही त्यांना अल्टा माऊंटमधील ए विंगच्या 33 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये घेऊन आले होते. तोच फ्लॅट त्यांना देतो असे सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी सुरु केली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना सुरुवातीला 25 लाख रुपये कॅश तर 40 लाख ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांत रजिस्ट्रेशन करु असे सांगून त्यांनी त्यांच्यासोबत फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नाही. ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या कॉलला प्रतिसाद देत नव्हते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या 65 लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र वारंवार कॉल करुनही त्यांनी त्यांना पैसे दिले नाही. नंतर त्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद करुन कॉल ब्लॉक केले होते. या दोघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी दोन्ही आरोपीविरुद्ध कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ब्रिजेश यादव आणि संतोष यादव या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना रविवारी ब्रिजेश यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत संतोष यादव हा फरार असल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे स्वस्तात फ्लॅटच्या बहाण्याने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.