गांजा विक्रीसाठी आलेल्या तीनजणांच्या टोळीस अटक

21 लाखांचा 107 किलो गांजाचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
कल्याण, – गांजा विक्रीसाठी आलेल्या तीनजणांच्या एका टोळीला कल्याण अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. वसीम नुरुजमा खान ऊर्फ पिला, दिनेशकुमार सजीवर सरोज आणि मोहित मेवालाल वर्मा अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी 21 लाख 40 हजार रुपयांचा 107 किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

इतर राज्यांतून आणलेल्या गांजाची विक्रीसाठी काहीजण कल्याण परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस शिपाई राहुल शिंदे, अमीत शिंदे, आकाश बिरपन, खांडेकर, खरसाण आदी पथकाने कल्याणच्या वाडेघर डंपिंग गाऊंडजवळील सार्वजनिक रोडवर साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी दुपारी दोन वाजता तिथे तीन तरुण आले होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटत होती. ते तिघेही हातवारे करुन एकमेकांशी चर्चा करत होते, त्यामुळे या तिघांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले होते.

तपासात या तिघांची नावे वसीम खान, दिनेशकुमार सरोज आणि मोहित वर्मा असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडे पोलिसांना 21 लाख 40 हजार रुपयांचा 107 किलो गांजा, साडेदहा हजाराची कॅश आणि तीन मोबाईल जप्त केले. यातील वसीम हा भिवंडीच्या शांतीनगर, बिलालनगर, दिनेशकुमार ठाण्यातील वागळे इस्टेट, लुईसवाडीच्या मार्कर्ड यादर चाळ तर मोहित हा मुलुंडच्या एलव्हीएस रोड, शिवशक्ती इमारतीमध्ये राहतो. याप्रकरणी पोलीस शिपाई आकाश बिरपन यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिघांनाही पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवार 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील ड्रग्ज तस्कर असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील वसीमला अडीच किलो चरस, दिनेशकुमारला 1820 किलो गांजासह घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलने तर मोहितला मुलुंड पोलिसांनी ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही जामिनावर बाहेर आले होते. जामिनावर येताच ते तिघेही ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत सक्रिय झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page