मनी लॉड्रिंगसह बॉम्बस्फोटाची भीती दाखवून बँक अधिकार्‍याला गंडा

अटकेची भीती दाखवून 41 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – जानेवारी महिन्यांत दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटासह मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघडकीस आल्याचा आरोप करुन एका निवृत्त बँक अधिकार्‍याला अज्ञात सायबर ठगाने सुमारे 41 लाखांना गंडा घातला. डिजीटल अरेस्टखी भीत दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी तीन सायबर ठगाविरुद्ध पूर्व सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या ठगाने तक्रारदाराच्या बँक खात्यासह शेअर विक्रीतून आलेली रक्कम तसेच पत्नीच्या नावाने बँकेतून लोन काढण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक केल्याने तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल झाल्याने आरोपींच्या अटकेसाठी सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

61 वर्षांचे तक्रारदार राजेंद्र तुकाराम सुर्वे हे भांडुप परिसरात राहतात. ते एका नामांकित बॅकेतून निवृत्त झाले आहेत. 10 मार्चला ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षक सिंग नाव सांगणार्‍या एका व्यक्तीचा सिग्नल अ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉल आला होता. जानेवारी महिन्यांत दिल्लीत बॉम्बस्फोट झाला होता. या गुन्ह्यांत डॉ. झाकीर शाहीन नावाच्या एका आरोपीची एनआयएकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून जो मोबाईल प्राप्त झाला आहे, त्यात त्यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या आधारकार्डसह इतर दस्तावेजाचा वापर करुन एका बँकेत अकाऊंट उघडण्यात आले होते. त्यात 2 कोटी 65 लाख रुपये जमा झाले होते.

हा मनी लॉड्रिंगचा प्रकार असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची संपूर्ण प्रॉपटी जप्तीसह त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याचे आदेश एटीएससह एनआयएला कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यांत कुठल्याही क्षणी अटक होणार आहे. ते वयोवृद्ध असल्याने त्यांच्यावर प्रत्यक्षात अटकेची काारवाई होणार नाही, मात्र ते डिजीटल अरेस्ट असतील, या दरम्यान त्यांना घराबाहेर पडता येणार नाही. कोणाशी संपर्क साधता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने त्यांची चौकशी असल्याची बतावणी करुन त्यांच्या कुटुंबियांची तसेच बँक खात्याची माहिती काढण्यास सुरुवात केली होती.

त्यांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम, त्यांचा भांडुपचा फ्लॅट विकून, शेअरमध्ये गुंतवणुक केलेले शेअर विकून ती रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. अटकेच्या भीतीने टप्याटप्याने सुमारे 41 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. त्यांना त्यांच्या पत्नीच्या नावाने लोन काढण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने दहा लाखांचे लोन काढले होते. ही रक्कम त्यांच्याकडून सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेण्यात आली होती. काही दिवसांनी सिंगने त्यांना पुन्हा कॉल करुन त्यांची अटक होणार नाही. प्रकरण मिटलेले आहे,

या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आलेला नाही. त्यामुळे त्यांची सर्व रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठविली जाणार असल्याचे सांगितले. मात्र बरेच दिवस उलटूनही त्याने त्यांना त्यांची रक्कम पाठविली नाही. नंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह पूर्व सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून एटीएस आणि एनआयएच्या संबंधित कथित पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित तीन सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पूर्व सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. ही रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या गुन्ह्यांत लवकरच संबंधित खातेदारांविरुद्ध अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page