घरखर्चासाठी रात्रीच्या वेळेस घरफोडी करणार्या टोळीचा पर्दाफाश
दोन्ही आरोपीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल तर चार गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – नोकरीतून जास्त पैसे मिळत नाही म्हणून घरखर्चासाठी घरफोडी करणार्या एका सराईत टोळीचा डी. एन नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांतील दोन सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली. रशीद मोहम्मद रफिक शेख आणि सैद अहमद मस्तान शेख ऊर्फ अली अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून चोरीची काही कॅश आणि घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य पोलिसांनी जप्त केली आहेत. अटक आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात तेराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असून त्यांच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांनी सांगितले. अटक केलेल्या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार गुड्डू युसूफ खान हे बोरिवली परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे अंधेरी येथे एक शॉप आहे. 25 एप्रिलला रात्री उशिरा त्यांच्या शॉपचे शटर तोडून अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश करुन काही कॅश चोरी करुन पलायन केले होते. 26 एप्रिलला हा प्रकार लक्षात येताच गुड्डू खान यांनी डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु केला होता. अंधेरी ते विरारदरम्यानचे 175 हून अधिक सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन संबंधित गुन्ह्यांतील आरोपी रेकॉर्डवरील सराईत आरोपी असल्याचे उघडकीस आले होते.
आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असतानाच अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे, पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस हवालदार रोहन बंगाळे, ऋषिकेश बाबर, प्रसाद वरे, सुमीत पोळ, अनिकेत वाकोडे, संग्राम पात्रे आदी पोलीस पथकाने सैद अहमद शेख याला नालासोपारा येथील पेल्हार येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली देताना याकामी त्याला रशीद शेख याने मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर रशीदला दुसर्या दिवशी पोलिसांनी अटक केली.
तपासात दोन्ही आरोपी नालासोपारा येथील पेल्हार, जब्बारपाड्यातील रहिवाशी आहे. ते दोघेही घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. नोकरी करुन जास्त पैसे मिळत नसल्याने ते दोघेही घरफोडी करत होते. दिवसा रेकी केल्यानंतर ते दोघेही रात्रीच्या वेळेस घरफोडी करत होते. या दोघांविरुद्ध गोवंडी, चेंबूर, ट्रॉम्बे माटुंगा, पंतनगर, दादर, एमआरए, टिळकनगर, भायखळा आणि एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात तेराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांनी अलीकडेच डी. एन नगर हद्दीत दोन तर भोईवाडा आणि एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे चार घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्या अटकेने या चारही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या दोघांनाही लवकरच एल. टी मार्ग आणि भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. या दोघांच्या अटकेसाठी पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे व अन्य पोलीस पथकाला एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे व दहिसर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत कांबळे यांनी विशेष मदत केली होती.